भूताच्या भेटीसाठी सोमवती अमावस्येचे औचित्यसाधून औंध येथील कोडयाच्या माळावर सोमवारी रात्री निघणार अनोखी सहल

औंध(वार्ताहर):-भूत म्हटले प्रत्येकाच्या पोटात भितीचा गोळा येतो,लहान मुले तर भूत म्हटले की घाबरून जातात समाजामध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेल्या भूताच्या भितीला तसेच समज गैरसमजुतीला मूठमाती देण्यासाठी सोमवारी सोमवती अमावस्येनिमित्त “कोडयाचे माळ”येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धा निर्मूलन औंध शाखेच्यावतीने सहलीचे आयोजन केले जाणार असून स्मशानभूमीत काढल्या जाणाऱ्या सहलीसाठी जास्तीत जास्त संख्येने ग्रामस्थ, युवक,सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन येथील अंधश्रद्धा निर्मूलन शाखेचे प्रशांत जाधव व श्रीपाद सुतार यांनी केले आहे.एखादी व्यक्ती वेडीपिसी,विचित्र हावभाव करु लागली तसेच समाजात काही विक्षिप्त घटना घडू लागल्या की भुताकटी लागली का ,त्या व्यक्तीवर जादूटोणा झाला का,भानामती अंगात शिरली का या व अशा अनेक चर्चा शंका उपस्थित केल्या जातात त्यासाठी मग तांत्रिक मांत्रिकाकडून विविध प्रकारचे विधी करणे ,अंगारे धुपारे करणे ,अघोरी कूत्ये करणे असे प्रकार आपणास आढळून येतात या गैरसमजुती मुळे अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत.वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रथांना चालीरितींना तिलांजली देण्यासाठी औंध येथील अंधश्रद्धा निर्मूलन शाखेच्यावतीने सोमवारी स्मशानभूमीस भेट देण्याच्या अनोख्या सहलीचे आयोजन केले जाणार आहे. सायंकाळी सात वाजता स्वामी समर्थ सेवा आश्रमात ग्रामस्थ ,युवक एकत्रित येणार आहेत. त्यानंतर कुप्रसिद्ध असणाऱ्या कोडयाच्या माळावर सर्वजण जाणार आहेत. त्याठिकाणी ओळख,प्रबोधनात्मक कार्यक्रम,चळवळीतील गाणी,अल्पोपहार, भुताविषयी बोलू काही याविषयी चर्चा आयोजित केली जाणार आहे. यावेळी पौर्णिमा, अमावस्येदिवशी भुताविषयी समाजात असणारे गैरसमज, रुढी परंपरा याविषयी प्रशांत जाधव,श्रीपाद सुतार, तानाजी इंगळे ,बाळकृष्ण कुंभार,जयवंत खराडे,दत्तात्रय शिंदे,भरत यादव,अरुण रणदिवे,शुभम इनामदार, हे परिसंवादात सहभागी होऊन आपली मनोगते व्यक्त करणार आहेत. दरम्यान या अनोख्या सहलीचे कुतूहल व चर्चा सध्या औंध परिसरात सुरू असून सोमवारी रात्री स्मशानभूमीत भुताच्या भेटीच्या सहलींची सर्वांना उत्सुकता लागली आहे