ज्योतिषशास्त्राने महाराष्ट्र अंधश्रध्देत बुडेल :- प्रा. डॉ. विलास खंडाईत.

सातारा दि. (प्रतिनिधी) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात या वर्षापासून ज्योतिष शास्त्र या विषयात पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. इग्नूचा हा निर्णय अत्यंत चूकीचा आहे. हा निर्णय युवा पीढीला अंधश्रध्दावादी बनवणारा असून तो पुरोगामी महाराष्ट्राला अज्ञानात आणि अंधश्रध्देत बुडवणारा आहे, अशी भूमिका अंधश्रध्दा निर्मूलन समितिचे सातारा जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा. डॉ. विलास खंडाईत यांनी व्यक्त केली. यासंदर्भात प्रा. डॉ. खंडाईत यांनी अंनिसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर निवेदनही दिले आहे. यावेळी अंनिसचे सचिव अनंता वाघमारे, उपाध्यक्ष सुनील खरात, कोषाध्यक्ष प्रा. प्रविण बोरगावे उपस्थित होते.

सदर निवेदनात प्रा. डॉ. विलास खंडाईत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा आहे. त्यामुळे या महाराष्ट्र भूमीला ‘बुध्दीच्या देशा’ असे म्हटलं जाते. संत चक्रधर स्वामींपासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत प्रबोधनाचा वसा या भूमीत रोवला आहे. महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या अणि अशा समाजसुधारकांनी महाराष्ट्राला दिशा दिली. स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तर या जोतिषशास्त्राला कडाडून विरोध केला होता. ही विरोधाची दिशादर्शक चळवळ चालू ठेवणे प्रत्येक नव्या पीढीचे आणि त्या प्रतिनिधित्व करणाऱ्या सूज्ञ युवकाचे व नागरिकांचे कर्तव्य आहे.

१९ ७५ साली जगभरातील १८६ ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी परिपत्रक काढून ज्योतिष शास्त्र हे शास्त्रच नसल्याचे स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये १९ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांचा समावेश होता. थोडक्यात वैज्ञानिक कसलाही आधार नसणारे केवळ अंदाज आणि तर्कावर आधारित असलेले ज्योतिषशास्त्र जगभराने नाकारले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीत इग्नूच्या ज्योतिष शास्त्र अभ्यासक्रमास मान्यता देऊ नये. ज्योतिष शास्त्र हे जसे महाराष्ट्राच्या संतपरंपरेला आणि महापुरुषांच्या सुधारणावादी चळवळीला मारक आहे, तसेच ते महाराष्ट्राच्या समग्र विकासप्रक्रियेला नुकसान पोहचविणारे आहे. त्यामुळे सरकारने इग्नूला साथ देऊन पुरोगामी महाराष्ट्राला पाठिमागे नेऊ नये, अशी विनंतीही मुख्यमंत्री महोदयांना प्रा. डॉ. विलास खंडाईत यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.