राज्यस्तरीय बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेत आयुष मोकाशी प्रथम

साताराः पुणे येथे महाराष्ट्र संघासाठी (जुनियर गट) झालेल्या वेस्ट झोन बॉक्सिंग निवड चाचणीमध्ये सातारा बॉक्सिंग अकॅडमीचा राष्ट्रीय खेळाडू आयुष अमर मोकाशी याने 54 ते 57 किलो वजनगटात प्रथक क्रमांक मिळवला. या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत आयुष याने सुवर्णपदक पटकावल्याने त्याची गोवा येथे दि. 14 ते 16 मे या कालावधीत होणार्‍या वेस्ट झोन बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आयुष मोकाशी हा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी पत्रकार अमर मोकाशी यांचा चिरंजीव असून तो आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. दोन वर्षापुर्वी दीव- दमन येथे झालेल्या वेस्ट झोन बॉक्सिंग स्पर्धेत आयुष याने 48 ते 50 किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले होते.
त्यानंतर आता गोवा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आयुष महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा पदकाची कमाई करेल, असा विश्‍वास त्याचे प्रशिक्षक सागर जगताप, सहप्रशिक्षक गोपाल राठोड यांनी व्यक्त केला आहे. या यशाबद्दल आयुष याचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे भरतकुमार व्हावळ, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.