बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांचे पुस्तके देऊन स्वागत
सातारा ः कोणत्याही जिल्ह्याची अथवा विभागाची प्रगती होण्यामध्ये सर्व व्यावसायिकांचे महत्वाचे योगदान ठरत असते. त्यासाठी त्यांचे व्यवसाय सुरळीतरित्या चालणे गरजेचे असते. सातारा शहराचा विकास झपाट्याने होत असून या विकासामध्ये बांधकाम व्यावसायिकांचे अनन्य साधारण योगदान आहे. यापूर्वीच्या काळात शहरातील गुंडागर्दीने बांधकाम व्यावसायिकांना नाहक त्रास दिला असल्याचे मला समजले पण आता यापुढील काळात या गुंडागर्दीचा कायम स्वरूपी मी बंदोबस्त करणार असल्याचे उद्गार सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी काढले.
सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संदीप पाटील बोलत होते. पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेप्रमाणे हार-बुके न देता अनेक पुस्तके देऊन बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना संदीप पाटील म्हणाले की, मागील काळात बांधकाम व्यावसायिकांना खंडणी मागणे, खोटे गुन्हे दाखल करणे यासारख्या त्रासांना सामोरे जावे लागले होते. पण आता या गुंडगिरीला ठेचून काढणार असून समाजातील सर्व व्यावसायिकांना कोणत्याही भिती खाली न राहता मुक्तपणे व्यवसाय करता येतील. याबरोबर व्यवसाय करत असताना होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निर्भयपणे पोलीसांशी संपर्क साधा असे आवाहनही संदीप पाटील यांनी यावेळी केले. यावेळी बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष मंगेश जाधव यांनी सातारा पोलीस विभागातर्फे सदस्यांच्या अडचणीच्या काळात मोलाची मदत मिळाल्याचे सांगितले. यामुळेच सातारा शहरातील गुंडागर्दीला रोखण्यात काही अंशी यश आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस परेड मैदानावर बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपणाचा व त्याची निगा राखण्याचा प्रकल्प राबवण्याविण्याचा मानस मंगेश जाधव यांनी सांगितला. तसेच बिल्डर्स असोसिएशन व पोलीस विभाग यांच्या सहकार्याने शहरातील अनेक प्रकल्प भविष्यकाळात राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.