सातारा : 1965 च्या युध्दामध्ये सैनिकांनी पाकिस्तानला धडा शिकवला. देशात कोणताही सैनिक पक्षीय भुमिकेतून सेवा देत नाही. त्याचे व्रत हे देश संरक्षणाचे आहे. सर्जीकल स्ट्राईक फत्ते करूनही त्याला मर्शरफ सरकार पुरावा मागत आहे. ही दुर्दैवी बाब आहे, पण आता पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा अशी माहिती महाराष्ट्र राज्य सैनिक पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुढे बोलताना कॅप्टन उदाजी निकम म्हणाले, छ. शिवाजी महाराजापासून निर्माण झालेली लढाऊ सैनिक परंपरा आजही अबाधित आहे. लढणारा सैनिक हा प्राणपणाने देशासाठी लढत असतो. त्याला जात, पात, धर्म व पक्ष नसतो. फक्त शत्रुशी दोन हात करणे, हेच त्याचे कर्तव्य व तीच त्याची देशभक्ती पण आहे. भारत स्वातंत्र झाला त्याच वेळी पाकिस्तान निर्मिती झाली आणि त्यांच्याकडून सातत्याने भारतभूमीवर होणारे हल्ले परतवून लावताना सैनिक पराक्रमाची ठसठसीत बाजु इतिहासाला ठाऊक आहे. पाकिस्तानला आजपर्यंतच्या सर्व कुरबुरी व दुतोंडीपणा याला कृतीने उत्तर देण्याची क्षमता भारतीय सैन्यात असताना त्यांच्या कर्तृत्वावर एखाद्या पक्षातील नेत्याने आक्षेप घेवून गरळ ओखणे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे.
काश्मिरमधील पाकच्या कृतीला उत्तर देताना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय कमांडोनी दिलेले प्रत्युत्तर पाकिस्तानच्या गुर्मीत असलेल्या सैन्यावर झोंबले आहे. महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटना या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.