भुईज ः साखरेच्या आयात-निर्यातीमध्ये अग्रेसर असलेल्या चीनच्या शांघायमधील अलवीन शुगरसह शांघायस्थित ट्रेडिग, गुंतवणुक, शुगर रिफायनरी आदी क्षेत्रातील उद्योगपतींनी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास भेट दिली.
शांघायमधील अलवीन शुगरचे भारतातील प्रतिनिधी अनुज जग्गा यांच्या नेतृत्वाखाली ऑरका इनव्हेस्टमेंट, शांघाय डिसकव्हरींग इनव्हेस्टमेंट कंपनी, सीईएस फायनान्सियल होल्डिंग कंपनी, लिंक कमोडीटीज, शांघाय असेट मॅनेजमेंट कंपनी, जॉस टेरनरी फ्युचर्स कंपनी आदी विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या सुमारे चोवीस उद्योगपतींनी राज्यातील साखर उद्योगाची माहिती घेण्यासाठी किसन वीर साखर कारखान्याची निवड करून त्याअंतर्गत कारखान्यास भेट दिली.
पारंपारिक पद्धतीने शिंग-तुतार्यांच्या गजरात कारखान्यातील महिला कर्मचार्यांकडून केलेले औक्षण, शॉल, हार, नारळ देऊन संचालक मंडळ व अधिकार्यांच्या हस्ते केलेल्या सत्काराने हे उद्योगपती भारावून गेले. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, आर्थिक सल्लागार एन. एस. पाटील व कार्यकारी संचालक अशोकराव जाधव यांनी या उद्योगपतींना किसन वीर उद्योग समुहाची माहिती दिली. मॅप्रो फुडस्ने त्यांच्यासाठी खास बनविलेल्या क्लासिक सॅडविच आणि स्ट्रॉबेरी विथ क्रिमचा आस्वाद घेत या उद्योगपतींनी कारखान्याने गेल्या बारा वर्षात केलेल्या चौफेर प्रगतीची इंग्रजी चित्रफितही तितक्याच तन्मयतेने पाहिली.
या उद्योगपतींनी साखर, अल्कोहोल, वीज, सीएनजी गॅस उत्पादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेत समाधान व्यक्त केले. सहकारी साखर कारखानदारीमध्ये साखरेशिवाय सभासद हिताचे अनेक उपक्रम-पुरक उद्योग कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या दुरदृष्टीतून उभारल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
व्यवस्थापनाच्या आदरातिथ्याने भारावलेल्या मनस्थितीत या उद्योगपतींनी सर्वांचा निरोप घेतला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक प्रताप यादव, मधुकर शिंदे, विजय चव्हाण, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, फायनान्स अॅण्ड अकौटं मॅनेजर टी. जी. पवार, प्रोडॅक्शन मॅनेजर ए. एस. साळुंखे, इन. सेक्रेटरी एन. एन. काळोखे, मुख्य शेती अधिकारी विठ्ठल कदम, एचआर मॅनेजर ए. टी. शिंगटे, सिव्हिल इंजिनियर एच. एस. पाटील, परचेस इन्चार्ज राजेंद्र भिमराव भोईटे, लिगल इन्चार्ज एल. बी. शेळके, ईडीपी मॅनेजर आर. जे. सणस, इन्चार्ज ऊस विकास अधिकारी ए. जे. ढमाळ, शुगर गोडावून किपर बी. आर. जाधव, एस.आर. इन्फोटेकचे एन. एस. पाटील, शेखर भोसले-पाटील, सुनिल शिवथरे, किशोर बाबर, राजेंद्र धुमाळ, विकास डेरे, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.