खटाव : खटावमध्येे बॉम्ब सदृश्य संशयित वस्तु सापडल्यामुळे खळबळ उडाली. तर बॉम्ब पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती.
येथील इंदिरानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या श्रीमती सिंधु शिवाजी रोकडे यांच्या घरातून हा बॉम्ब हस्तगत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुण्यातील पिंपरी चिंचवड दौर्याच्या पार्श्वभुमीवर तेथे स्फोटक वस्तु सापडल्यानंतर या गुन्ह्यातील संशयित बॉम्ब सदृश्य वस्तुपैकी एक वस्तु पुसेगाव पोलीसठाणे हद्दितील खटावमधील सिंधु रोकडे यांच्या घरी असल्याची खबर पुसेगाव पोलीस ठाण्याचे खटाव बीट हवालदार बबनराव गायकवाड यांना मिळाल्यानंतर संबधित संशयित वस्तुची चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर 308/ 2016 भारतीय स्फोटकाच्या कायदा कलम 5 प्रमाणे आज पहाटे नोंद झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने डि.वाय. एस. पी प्रेरणा कट्टे, पुसेगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नी. राजेंद्र सावंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उध्दव वाघ, पोलीस हवालदार बबनराव गायकवाड, पोलीस नाईक राजेंद्र कुंभार, पोलीस हवालदार चव्हाण आदिंनी संबंधित व्यक्तीच्या घरी तपासणी केली असता सदर संशयित वस्तु त्यांच्या घरात आढळुन आली.
घटनास्थळी बी.डी.डी.एस. बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकामार्फत सदर संशयित वस्तुची तपासणी करुन खात्री केली असता तो स्फोटकजन्य बदार्थ असल्याचे सकृतदर्शनी या पथकातील लोकांनी सांगितले. सदर घटनेचा पंचनामा करुन पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनकडे तो सुपुर्द करण्यात येणार असल्याचे डि.वाय. एस.पी. प्रेरणा कट्टे यांनी यावेळी बोलताना सांगितले. बॉम्ब शोध पथकात विजय साळुंखे, प्रमोद नलवडे, राजेंद्र शेळके, प्रमोद भुजबख आदि घटनास्थळी उपस्थित होते.