Wednesday, March 19, 2025
Homeकरमणूकसातारच्या न्यु इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक देत आहेत अनोख्या कलेचे दर्शन ; ...

सातारच्या न्यु इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक देत आहेत अनोख्या कलेचे दर्शन ; कैलास बागल यांचे जिल्हयातील दुर्ग गडकोट किल्ल्यांचे अनोखे प्रदर्शन


सातारा (अतुल देशपांडे यांजकडून)ः येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यु इंग्लिश स्कूलच्या 95 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक सोहळा मोठया उत्साहात संपन्न होत आहे.यानिमित्त क्रिडा महोत्सवही तितक्याच उत्साहात साजरा झाला. दरवर्षी साजर्‍या होणार्‍या क्रिडा महोत्सवाची आगळीवेगळी निमंत्रणपत्रिका कलात्मकरित्या साकारण्याचा जणूकाही विडाच कलाशिक्षकांनी उचलला आहे व त्याचा प्रत्यय येथे येणारे महोत्सवाचे पाहुणेही पाहत हरकून जात आहेत.गेली आठ वर्षे कार्यक्रमाची बनवली जाणारी विषयाला अनुसरून अनोखी कार्यक्रमपत्रिका या कलाशिक्षकांकडून साकारली जात आहे. केवळ क्रिडा महोत्सवच नव्हे तर शाळेचा कोणताही समारंभ असू दे त्याला अनुषंगीक अशी कलात्मक कलाकृती नवले व माळी सर साकारत आहेत.

23
सेनापती चांगला असेल तर सैन्यही तितक्याच ताकदीने लढते याचाच प्रत्यय शाळेच्या कला विभागातून पहायला मिळत आहे. या दोन्ही कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विविध वर्गातील मुलामुलींना मिळालेल्या मार्गदर्शनातून शाळेचे कलादालन अक्षरशः बहरून गेले आहे. टाकाऊ वस्तूंपासून अतिशय देखण्या व पाहताक्षणी आपल्याशा कराव्यात अशा अनेक कलाकृतीचे प्रदर्शन शाळेच्या कलादालनात भरविण्यात आल्या आहेत.
भूमीपुजन कार्यक्रमासाठी कागदी नारळ फोडताच त्यातून दिसणारी सुरेख कार्यक्रमपत्रिका, क्रिडा महोत्सवाच्या पाहुण्यांची महाराष्ट्र केसरी पदाची शान ही त्यांच्याच खेळातील गदा देवून सादर झाली. ही गदा नुकतीच पाहुणे धनाजी फडतरे यांना दिल्यावर मला ही गदा का दिली हे विचारताक्षणीच गदेच्या मध्यभागातून गदा खोलताच या गदेतून सादर झालेली कार्यक्रमाची रूपरेषा अचंबित करणारी होती. अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमपत्रिका प्रासंगिक गणेशोत्सव, आषाढी एकादशी, या कलाशिक्षकांनी कलात्मक करून नव्या पिढीला कलेचा समृध्द वारसाच दिला आहे.
दरम्यान, शाळेचे लोकप्रिय शिक्षक कैलास बागल जे नेहमीच गडकोट मोहिमा आखतात आणि यशस्वी करून दाखवतात जे सध्या शाळेचे नौदलाचे नेतृत्वही करतात. अशा कैलास बागल सरांनी स्वखर्चातून कलादालनात सध्या जिल्हयातील सुमारे 25 हून अधिक ज्ञात-अज्ञात गड व किल्ल्यांचे चित्ररूप प्रदर्शन भरवले आहे.सातारा जिल्हयात असणारा राजधानी अजिंक्यतारा, सज्जनगड, पराक्रम सांगणारा प्रतापगड याबरोबरच अपरिचित असे माण, खटाव तालुक्यातील वारूगड, संतोषगड, वाईमधील पांडवगड, वैराटगड, महिमंडणगड, कमळगड, जंगली जयगड, व वनदुर्गातील मकरंदगड, भैरवगड, सामान्य लोकांना अपरिचित असणारे दातेगड, वारूगड हे किल्ले येथे प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. बागल सरांनी चित्रित केलेल्या छायाचित्रामंधून केवळ किल्ल्यांचेच फोटो नव्हे तर या किल्ल्यातील ऐतिहासिक विशेषता, जैवविविधता, वनसंपत्ती, ऐतिहासिक महत्व, प्राणी, पक्षी, किटक यांचे चित्ररूप दर्शन यातून घडत आहे. साकारला गेलेला हा उपक्रम बागल यांनी स्वखर्चातून निर्मित केला असून गेली अठरा वर्षे ट्रेकिंगच्या मार्ध्यमातून हा अनमोल ठेवा जतन करता आला असे ते सांगतात. तब्बल 66 वेळा वासोटा किल्ल्याचे दर्शन घेत राज्यातील तैलबैला, वानरसुळका, तिकोना यासारख्या अवघड सुळक्यांची चढाईही बागल यांनी करत स्वतःसोबत सहयाद्री ट्रेकर्सच्या बॅनरखाली 40 ते 50 जणांचा ट्रेकर्स प्रेमींचा समुहच बनवला आहे. रानोमाळ भटकताना वयाचा मुलाहिजा न बाळगता दहा ते 50 वर्षाच्या वयोगटातील अनेक युवा यात उत्साहाने सहभाग घेतात व हाच उत्साह मला प्रेरणा देतो असे त्यांनी सांगितले.
 न्यू इंग्लिश स्कूलमधील या प्रदर्शनापूर्वी सादर झालेले सज्जनगड, धावडशी येथील या चित्रप्रदर्शनाचे कौतुक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मिलींद गुणाजी यांच्याकडून झाल्याने हा उत्साह मला नवी उर्मी देत असल्याचे बागल यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular