महाबळेश्वर: पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून महाबळेश्वर पासून सात किमी अंतरावर मेटतळे गावाच्या हद्द्ीत चंद्रशेखर साबणे व श्रीनिवास नगरकर (दोघे रा. पुणे) या दोन धनिकांनी बंगल्याच्या बांधकामासाठी बेसुमार विना परवाना वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी तहसिलदार रमेश शेंडगे यांनी तातडीने वृक्षतोडीचा पंचनामा करून पुण्याच्या त्या दोन्ही धनिकां विरूध्द पोलिस ठाण्यात विनापरवाना वृक्षतोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महसुल विभागाने केलेल्या धडक कारवाईचे शहरातून कौतुक केले जात आहे.
येथील निसर्ग सौंदर्यामुळे महाबळेश्वरला मिनी काश्मिर संबोधले जाते. ज्या कोणाला काश्मिरला जाणे शक्य नाही ते काश्मिर समजुन महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी येतात. येथील पर्यावरणाला अनन्य साधारण महत्व असल्याने केंद्र शासनाने 2001 साली महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल म्हणुन घोषित करून विनापरवाना बांधकामे व वृक्षतोडीवर निर्बंध घातले या निर्बंधाचे पालन होते की नाही या साठी अनेक कमिटया नेमण्यात आल्य. सर्वसामान्य व्यक्ती बांधकाम करताना सर्व समित्यांचा ना हरकत दाखला घेतात, रितसर बांधकाम परवाना घेतात मात्र धनिक सर्व नियम पायदळी तुडवुन विनापरवाना वृक्षतोड करून बेकायदशीर बांधकामे करण्यात यशस्वी होतात. असेच एक प्रकरण येथील पत्रकारांनी उघडकीस आणले आहे.
येथुन आठ किमी अंतरावार मेटतळे गावाच्या हद्द्ीत सि स नं 5 चा 2 या 56 गुंठे मिळकती मध्ये बंगल्याच्या बांधकामामध्ये अडसर ठरणारे अनेक वृक्षांची राजरोसपणे विनापरवाना कत्तल केली आहे. यामध्ये जांभुळ हिरडा गेळा रामेटा आदी वनौषधी वृक्षांचा समोवश आहे. गेली अनेक वर्षापासून येथील पर्यावरण सांभाळणारे व उनपावसाची तमा न बाळगता तग धरून उभे असलेले मोठ मोठया वृक्षांची कत्तल मिळकत धारक धनिकाने केली आहे.तसेच महाबळेश्वर प्रतापगड रस्त्या पासून मिळकतीमध्ये जाण्यासाठी मोठा रस्ताही तयार केला आहे. यासाठीही अनेक वृक्षांना मुठमाती देण्यात आली आहे.
तोडलेले वृक्षांचे बुंधे मातीमध्ये तर काही वृक्षांचे बुंधे तोडलेल्या झाडांच्या पाला पाचोळयामध्ये दडवुन ठेवण्यात आले आहे. काही दिवसांनी या पाळा पाचोळा पेटवुन तोडलेल्या वृक्षांचे बुंधे हे जाळुन पुरावा नष्ट करण्याचा मानस या धनिकांचा असल्याचे दिसते. येथील सर्व पत्रकार अतिदुर्गम भागातील कुमठे या गावातील शाळेला भेट देण्यासाठी गेले होते. तेथुन परत येत असताना मेटतळे गावाच्या हद्द्ीत रस्त्यालगत एक मातीचा नविन रस्ता केल्याचे निदर्शनास आले या वरून येथे नक्कीच वृक्षतोड झाली असावी असा संशय येथील पत्रकारांना आला. त्यांनी संबंधित मिळकतीमध्ये जावून पाहिले असता ही वृक्षतोड निदर्शनास आली.पत्रकारांनी तातडीने ही बाब तहसिलदार रमेश शेंडगे यांना कळविली तहसिलदा यांनी तातडीने मेटतळे गावचे तलाठी गमरे, अव्वल कारकुन अमोल सलागरे व इतर कर्मचारी घेवुन वृक्षतोड झालेल्या घटनास्थळी भेट दिली असता त्यांनाही ही विनापरवाना बेसुमार वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या वृक्षतोडीचा पंचनामा करून मिळकत धारका विरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश तलाठी यांना दिले त्यानुसार तलाठी यांनी तातडीने पंचनामा करून पुण्याच्या दोन धनिकांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला व कारवाईचा अहवाल तहसिलदार रमेश शेंडगे यांना सादर केला.
महसुल विभागाने केलेल्या या कारवाईमुळे वृक्षसंहारकांमध्ये खळबळ माजली असून शहरातून या कारवाईचे कौतुक केले जात आहे.