पुणे जिल्ह्यातील एका आमदाराला बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅपचा प्रयोग करणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

 

सातारा :- पुणे जिह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅपचा प्रयोग करणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार एका युवतीमुळे उघडकीस आला असून, याप्रकरणी आमदार दिलीपराव मोहिते-पाटील यांचे पुतणे मयुर साहेबराव मोहिते-पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मयूर मोहिते-पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आ. दिलीप मोहिते-पाटील यांना हनी ट्रपमध्ये अडकवून बदनामीच्या भितीने त्यांच्याकडून लाखो रूपयांची माया गोळा करण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात संबंधित युवतीला काही रक्कम संशयितांनी दिली होती. मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हे प्रकरण उजेडात आणले. दि.22 एप्रिल रोजी साताऱयातील त्या युवतीने तक्रारदार मयुर यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला.

संबंधित युवतीने चौकशीत दिलेली माहिती अशी की, शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे दि.12 एप्रिल रोजी साताऱयात संबंधित युवतीला भेटण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांनी तिला आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून, त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्याबद्ल्यात संशयितांनी त्या युवतीला काही रोख रक्कम व पुण्यात एक फ्लॅट देण्याचे कबुल केले होते. त्यासाठी तुला त्यांच्याकडे नोकरीच्या बहाण्याने जायचे असून त्यानंतर त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांची बदनामी करावी लागेल, असा प्लॅन संशयितांनी युवतीला दिला. त्याबदल्यात तीला वेळोवेळी एकूण 90 हजार रूपये देण्यात आले होते. मात्र, हा सगळा प्रकार मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचे पुतणे व तक्रारदार मयुर यांना फोन करून सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नसून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे करत आहेत.