औंध : पावसाने औंध भागातील अनेक रस्ते, पूल, शेतीचे, शेती पीक उत्पादनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे औंध (नवटवस्ती) ते खरशिंगेकडे जाणार्या रस्त्यावरील आंबेहोळ हा सुमारे साठ ते सत्तर फूट लांबीचा पूल व त्यावरील भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. यामुळे अनेक शेतकर्यांचा आपल्या शेताकडे तसेच खरशिंगे भागातील अनेक वस्त्यांकडे जाणारा रस्ताच हरविल्याने संपर्क तुटला आहे. त्यामुळे याभागातील नागरिक, शेतकर्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
औंध(नवटवस्ती) ते खरशिंगे गावानजीकच्या सुर्यवंशी,जाधव, माळी ,घार्गे वस्ती वअन्य वस्त्यांकडे जाणारा तसेच औंध परिसरातील सुमारे तीस ते चाळीस शेतकर्यांच्या शेतांकडे जाणार्या रस्त्यावरील पूल प्रचंड पावसाने वाहून गेला आहे. सुमारे साठ ते सत्तर फूट लांबीच्या पुलाचा भराव पूर्णपणे निघून गेल्याने औंध ते खरशिंगे या मार्गावरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. यामुळे याभागातील शेतामध्ये जाणारी पाळीव जनावरे, शेतीकामासाठी जाणारे शेतकरी,शेतमजूर यांची मोठी अडचण होऊ लागली आहे.