पुणे : वा छान आता सर्वांना भरपूर पाणी मिळेल.. तर मुलांनो आपण आज काय शिकलो ! संघटित झाल्यास आपण आपला विकास करु शकतो…. वेळ दुपारी 1.00 वाजता.. स्थळ वाघोली येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा.. वर्ग होता इयत्ता पहिलीचा.. आणि शिक्षक होते साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ! कसे मिळेल पाणी.. ही कथा त्यांनी सांगितली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हवेली तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक 1 आणि 2 येथे भेट देऊन इयत्ता पहिली आणि इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिप कंद, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, गटविकास अधिकारी संदिप कोहीनकर, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, गट शिक्षण अधिकारी ज्योती परिहार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी इयत्ता पहिलीच्या बालभारतीमधील कसे मिळेल पाणी ही कथा मुलांना सांगून स्वत:च्या गावातील पाण्याची समस्या व संघटितपणे त्यावरील केलीली उपाययोजना हा संदेश यातून दिला. त्यानंतर दिव्या कादे, वैष्णवी जाधव आणि सिध्दी सातव यांना शाळा प्रवेश प्रमाणपत्राचे वाटप केले. तसेच चॉकलेटचे वाटपही त्यांनी यावेळी केले. यानंतर इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. मी कचरा करणार नाही, मी कचरा कुणालाही करु देणार नाही, मी स्वच्छता पाळेन, तसेच सगळ्यांना स्वच्छता पाळायला लावीन, माझा परिसर आणि माझा देश स्वच्छ ठेवीन, जय हिंद, जय महाराष्ट्र, अशी प्रतिज्ञा त्यांनी यावेळी दिली.