एनकूळ परिसरातील रस्त्यासाठी साडेआठ कोटीचा निधी : सदाभाऊ खाडे

कातरखटावः खटाव तालुक्यातील आदर्श संसद ग्राम एनकूळ गावच्या परिसरातील विविध रस्त्यांच्या कामासाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातून सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड नवनिर्वाण प्राधिकरण समितीचे अध्यक्ष सदाभाऊ खाडे यांनी दिली.
मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेल्या एनकूळ-कणसेवाडी रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. श्री. खाडे म्हणाले, गेले अनेक वर्षे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रीयपणे काम करत आहोत. आपली कर्मभूमी पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा असली तरी जन्मभूमी एनकूळचा आपणास कधीच विसर पडत नाही. या भागाचा रस्ते, पिण्याचे पाणी, शेती पाणी व इतर प्रश्न सुटण्यासंदर्भात आपला कायम ध्यास असतो. पूर्व भागातील रस्त्यांची अनेक वर्षाची अडचण आहे. ही अडचण आपण ग्रामविकासमंत्री पंकजाताईंसमोर पोटतिडकीने मांडली. त्यांनीही आपल्या निष्ठेची गांभीर्याने दखल घेवून भागासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून एनकूळ-दोरगेवाडी शिव, एनकूळ-पळसगांव, एनकूळ-किरकसाल, नढवळेमळा रस्ता, तडवळे माळवे वस्ती, खाडे वस्ती रस्ता ही कामे होणार आहेत.
जिहे-कठापूरचे पाणी या भागाला मिळण्यासंदर्भातही आपले जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहेत. भागातील कार्यकत्यांनी विकासकामासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात सामील व्हावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमास माजी सरपंच प्रकाश खाडे, भिमराव खरमाटे, श्रीमंत ओंबासे, ज्ञानेश्वर खाडे, मल्हारी खरमाटे, संतोष जाधव, धनाजी लवळे, संपत खाडे, अनिल खाडे, संतोष ढोले, रविंद्र खाडे, हेमंत खरमाटे, वसंत खाडे, जहांगीर शेख, रशिद शेख आदिंसह मान्यवर उपस्थित होते. प्रितम खरमाटे यांनी सुत्रसंचालन केले. विजय खाडे यांनी आभार मानले.