लेखी आश्वासन देवूनही बिल न दिल्याने शेतकर्‍यांचे सातार्‍यात आंदोलन

सातारा : सध्या चारी बाजूने शेतकरी अडचणीत आला असून नैसर्गिक आपत्तीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना भुईंज हे शेतकर्‍याच्या उसाचे बिल देतील या आशाने शेतकरी वाट पाहत होता. अखेर आदोलनाचे हत्यार उपसरल्या नंतर दोन वेळा लेखी आश्वासन देवूनसुध्दा पाळले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी कारखान्याचे चेअरमन मदन प्रतापराव भोसले यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केले असून आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सन 2019-20 गळित हंगामातील उसाचे बिल शेतकर्‍यांना सन्मानपूर्वक द्यावे अशी वारंवार विनंती केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातार्‍यातील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या निवास्थानासमोर आंदोलन सुरू केले. गेल्या सात महिन्यांपासून उस उत्पादक शेतकर्‍यांचे 33 कोटी 82 लाख रूपये देणे अद्याप दिलेले नाही. दोन वेळा कारखान्याने लेखी आश्वासन देवून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. त्याचा मान राखला पण कारखान्याने शब्द पाळला नाही. नवीन कृषि विधेयक धोरणाबाबत भाजप समर्थन करत आहे. तर दुसर्‍या बाजूला भाजपाची सत्ता असलेल्या कारखान्यात शेतकर्‍यांना उसाचे बिल मिळत नाही. याबाबत कोणतेही भाष्य करत नाही. या दुट्टपी धोरणाचाही शेतकर्‍यांनी निषेध नोंदवल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनभाऊ साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव यांनी दिली आहे.
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी 17 ऑगस्ट रोजी जावक क्र.1288 पत्रानुसार 30 ऑगस्टपूर्वी साखर आयुक्तांच्या सूचनेनुसार राहिलेले उसबिल अदा करण्यात येईल त्यानंतर जावक क्र.1704 दि.8 सप्टेंबर रोजी 25 सप्टेंबरपूर्वी उसबिले देणार असल्याचे लेखी कळविले आहे. परंतु उसाचे बिल न देता आंदोलन थांबेल या आशेवर साखर कारखाना वाट पहात असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने हे आंदोलन व्यापक स्वरूपात सुरू करून आंदोलनस्थळी उस परिषद घेण्याचा इशारा राजू शेळके यांनी दिलेला आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्याने कारखान्याच्या विरोधकांनीही लक्ष घालावे, अशी मागणी वाई तालुक्यातील शेतकरी करू लागले आहेत.