ग्रामपंचायत निवडणूक कामी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टँपपेपरची आवश्यकता नाही :- तहसीलदार प्रशांत थोरात.

पाटण :- सद्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कामी उमेदवारांसाठी लागणाऱ्या स्वयंघोषणापत्र, घोषणापत्र, जात पडताळणी, वंशावळ आदी प्रतिज्ञापत्रासाठी स्टँपपेपरची आवश्यकता नाही.. स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र घालण्याची सक्ती संबधितांनी करु नये. अशा सक्त सुचना पाटणचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी संबधितांना दिले.

सद्या सगळीकडे ग्रामपंचायत निवडणूकीची धामधूम सुरु असताना उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची धांदल सर्वच उमेदवारांची व कार्यकर्त्यांची उडालेली दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरताना कोणतीही त्रुटी राहणार नाही याची पुरेपूर काळजी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्याकडून घेतली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीच्या अनुषंगाने उमेदवरांनी अर्ज भरणे अपेक्षित आहे. घोषणापत्र, स्वयंघोषणापत्र, जात पडताळणी, वंशावळ आदी प्रतिज्ञापत्रासाठी उमेदवारांने स्टँपपेपरचा वापर करावा असा कुठेही उल्लेख नाही. तरी देखील अनेक उमेदवारांकडून स्टँपपेपरची आवश्यकता नसताना वापर केला जात आहे. याबाबतीत स्टँप विक्रेता कडून उमेदवारांची फसवणूक केली जात असून उमेदवारांना स्टँपपेपरची विक्री करताना स्टँपवर ‘निवडणूक कामी’ असा उल्लेख करून स्टँपपेपर जादा दराने विक्री केले जात आहेत. हि बाब काही उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या निर्देशनास आणून दिल्यानंतर उमेदवारांना अर्ज भरताना निवडणूक कामी कोणत्याही स्टँपपेपरची आवश्यकता नाही असे सांगितले. स्टँपविक्रीबाबत कोणाची तक्रार आल्यास संबधितावर कारवाई करण्याचे निर्देश हि तहसीलदार प्रशांत थोरात यांनी दिले.