वडूज: गोपूज (ता.खटाव) येथील ग्रीन पॉवर शुगर्सचे यावर्षीच्या गळीत हंगामाचे सहा लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व कारखान्याचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.
ग्रीन पॉवर शुगर्स कारखानास्थळावर यावर्षातील गळीत हंगामातील पहिल्या अकरा साखर पोत्यांचे पूजन भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. यावेळी लक्ष्मण माने, चंद्रकांत मोरे, दिलीप घार्गे, सुहास पाटील, संग्राम माने, जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या दोन ते तीन वर्षात खटावसह परिसरातील तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱी, सभासदांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर व पारदर्शक कारभारावर मोठा विश्वास दाखवून सहकार्याची भूमिका ठेवल्यानेच आत्तापर्यंतचे ग्रीन पॉवर शुगर्स या कारखान्याचे सर्व गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडल्याचे सांगून श्री. देशमुख म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांच्या हिताचा कारखाना व्यवस्थापनाने कायमच विचार केला आहे.
शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत ऊस उत्पादनाच्या माध्यमातून शेतकर्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी ऊस लागवडीसाठी तसेच शेतीपूरक उद्योगांसाठी कारखान्याच्या माध्यमातून विविध प्रभावी उपाय योजना राबविण्यात आल्या. शेतकरी व सभासदांच्या हिताचा कायमच कारखाना व्यवस्थापनाने विचार केला यावर्षीच्या गळीत हंगामात सर्वांच्या बरोबरीने ग्रीन पॉवर शुगर्स दर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोपीचंद पडळकर म्हणाले, खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यात साखर कारखाना उभारण्याचे स्वप्न संग्रामभाऊंनी वास्तवात साकारले आहे. शेतकर्यांच्या प्रगतीसाठी संग्रामभाऊंची असणारी धडपड त्यासाठीचे अविरत प्रयत्न, जिद्द व चिकाटी यांमुळेच हे शक्य झाले आहे. ग्रीन पॉवर शुगर्समुळे सातारा, सांगली जिल्ह्यांतील शेतकर्यांना मोठा दि लासा मिळाला आहे. कार्यक्रमास कारखान्याच्या विविध विभागांचे अधिकारी, खातेप्रमुख, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.