Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीकोरेगावात मातीमिश्रित वाळूच्या परवान्यातून अनाधिकृत हप्त्यांचा होतोय उपसा

कोरेगावात मातीमिश्रित वाळूच्या परवान्यातून अनाधिकृत हप्त्यांचा होतोय उपसा

सातारा: एकेकाळी राजमासाठी प्रसिद्ध असलेल्या कोरेगाव तालुक्यात आता अनाधिकृत वाळू उपसा आणि प्रशासकीय हप्ता यामुळे कुप्रसिद्ध होवू लागले आहे. सध्या मातीमिश्रित वाळूच्या परवान्यातून अधिक वाळू उचलताना अनाधिकृत हप्त्यांचाही उपसा केला जात आहे. यामध्ये अनेक वाटेकरी असल्यामुळे नदीपात्राच्या परिसराची अक्षरश: वाट लागली आहे. याबाबत सर्वच घटकांनी मौन धारण करुन वाळू चे कण रगडीता तेलही गळे याप्रमाणे आपले हात तेलकट करण्यात धन्यता मानली आहे.
सातारा, सांगली, सोलापूर या तिनही जिल्ह्यातील भूजलातील पाणीपातळी झपाट्याने घसरु लागली आहे. वाळूपेक्षा पाणी महत्त्वाचे आहे, हे उशीरा सुचलेले शहाणपण असले तरी काही अती शहाण्यांनी यावर सुद्धा मात केली आहे. भूजल सर्वेक्षणने अशा ठिकाणी वाळू उपसा केल्यास भूजलातील पाणी आटून विहिरी, नाले, ओढे कोरडे पडतील, अशी भीती व्यक्त करुन वाळू उपशाला बंदी घालावी, अशी शिफारस केली आहे. पण व्यक्तिगतरित्या मातीमिश्रित वाळू उपसा करण्यासाठी भूजल सर्वेक्षण कार्यालय हात ओले करुन ना हरकत दाखले देतात, अशी वाळू ठेकेदारांची समजूत झाली आहे. यामध्ये सत्य किंवा असत्य किती? हा भाग वेगळा असला तरी कोरेगाव तालुक्यातील देऊर, भाकरवाडी, जिहे याठिकाणी एक महिन्यासाठी मातीमिश्रित वाळूचा परवाना देण्यात आला आहे. या वाळू उपशाने चार दिवसांतच टार्गेट पूर्ण करुन सुमारे 2000 ब्रासचा टप्पा ओलांडण्यासाठी जेसीबी, पोकलॅन अशी आधुनिक यंत्रणा कामाला लावली आहे. जिल्हा महसूल खाते ते तलाठ्यापर्यंत सर्वच मॅनेज केले जात आहे. याबाबत आवाज उठविण्याचे साहस कोणी करु नये, यासाठी ङ्गचहा पानफ केले जात आहे. पण या उपशामुळे भविष्यात नदीनाल्याला पूर आल्यास जमीन खचण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या प्रतिदिन सुमारे 75 ब्रास वाळू उपसा होत असून हा उपसा महिनाभर चालणार आहे. त्यामुळे रॉयल्टी सरकारला मिळणार नाही, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. कारण या बुडलेल्या रॉयल्टीमधून ठराविक भ्रष्टाचारी प्रवृत्तींचा हप्ता ठरलेला आहे. कर नाही, त्याला डर कशाला याची चुणूक दाखविण्यासाठी प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी यांनी कारवाई करुन दूध का दूध व पाणी का पाणी करावे, अशी मागणी पुढे येवू लागली आहे. या तिनही गावातील काही टग्यांना माल पोहोच होत असल्याने गावकरी दबावाखाली वावरत आहेत. त्यांना आता प्रामाणिक कारवाईची प्रतिक्षा आहे. सातारच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनीच याबाबत गंभीर दखल घेवून या अनाधिकृत मातीमिश्रित वाळूच्या उपशाबाबत कायद्याचे हत्यार उपसावे, अशी अपेक्षा कोरेगावकरांची आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular