कराड : यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विक्रेंद्रीकरण करून सामाजिक, राजकीय, आर्थिक परिवर्तन केले, असे असताना त्यांचे नांव घेऊन नगरपरिषदेच्या सत्तेवर आलेल्या मंडळींनी कराड शहराचा चेहराच विदु्रप करून चव्हाणांच्या नावाला काळींबा फासला आहे. तसेच सत्ताधार्यांनी शहराच्या विकासासाठी आलेले 100 कोटी रूपये हडप केले आहेत असा घणाघाती आरोज माजी मंत्री कराड शहर नागरी विकास आघाडीचे विलासराव पाटील- उंडाळकर यांनी केला.
कराड नगरपालिका निवडणुकीत कराड शहर नागरी विकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ येथील आझाद चौकात दणक्यात झाला. यावेळी अॅड. उदयसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष व शहर नागरी विकास आघाडीचे अध्यक्ष अशोकराव भोसले, मदरभाई कागद, बाजार समितीचे सभापती पै. शिवाजीराव जाधव, प्रा. धनाजीराव काटकर, विजय मुठेकर, सारिका पवार, विमल मुळे, किरण मुळे, हर्षद कागदी, रेखा माने, नदाफ, मोहन लोखंडे, माजी नगरसेवक शब्बीर शेख आदी उपस्थित होते.
आ. उंडाळकर यांनी पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. भोई गल्ली ही स्वातंत्र्यचळवळीत त्यांचे योगदान मोठे होते. आता शहरातील परिवर्तनाच्या लढाईची सुरूवात या चौकातून होत आहे. मतदारांनी घाबरून न जाता मतपेटीतून क्रांती करण्याची हीच वेळ आहे.
यशवंतराव चव्हाणांनी सत्तेचे विक्रेंद्रीकरण करून सामाजिक, राजकीय, आर्थिक परिवर्तन केले. पण त्यांचे नांव सांगून सत्तेवर आलेल्या या मंडळींनी कराड शहराचा चेहराच विदु्रप केला.
रस्ते, पिण्याचे पाणी, डे्रनेज, कचरा हे प्रश्न सुटले नाहीत. सूज्ञ मतदारांनी मतपेटीतून जनतेचे शोषण करणार्या या प्रवृत्तीला उद्ध्वस्त करावे, असे आवाहन उंडाळकर यांनी केले.
शहरासाठी 100 कोटी दिले असे माजी मुख्यमंत्री सांगत असले तरी ते मंजूर करताना विधीमंडळात मी आमदार होतो. त्यामुळे हे पैसे गेले कोठे याचा जाब विचारण्याचा अधिकार मला आहे. या पैशांतून मूलभूत सुविधांची कामे झाली नाहीत. 50 वर्षे घरात सत्ता असताना शहरासाठी त्यांनी काय केले? याचा जाब जनतेने त्यांना विचारावा. पालिकेची 25 एकर जमीन सत्ताधार्यांनी घालविली. त्यांना याच मंडळींनी हातभार लावला, असा आरोपही विलासराव उंडाळकर यांनी नांव न घेता केला.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, इतक्या वर्षांत कराड शहरात काहीही बदल झालेला नाही. स्वच्छता, सांडपाण्याचे व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, रस्ते या सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीत अशीच मिळतात. शहराच्या विकासासाठी 100 कोटी दिले. या पैशांत नवे शहर वसले असते. पुस्तक तेच आणि कव्हरही तेच यामुळे शहराचे मोठे नुकसान झाले. आता बदलाची गरज आहे. नवीन चेहर्यांना आम्ही संधी दिली आहे. शहरासाठी निधी कमी पडणार नाही. स्वच्छ व पारदर्शी प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी अशोकराव भोसले, मदरभाई कागदी, डॉ. मधुकर माने यांची भाषणे झाली. नईम कागदी यांनी सूत्रसंचलन केले.