काऊदर्‍यावर हजारो भाविकांकडून निसर्गपूजा, महिलांची मोठी उपस्थिती

पाटण : पाटण तालुक्यातील मणदुरे येथील पठरावरील असणार्‍या काऊदर्‍यावर पुणे, सातारा, पाटण, तारळेबरोबर जेजुरी येथून आलेल्या भाविक तसेच निसर्गप्रेमींनी निसर्गपूजा केली. यावेळी महिलांना वनदेवी मानून त्यांना साडी अन् चोळी देत त्यांचीही पूजा करण्यात आली. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता निसर्गपूजेचा सोहळा पार पडला. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती. निसर्ग संपत्तीचे जतन करा, तसेच संवर्धन करा, असा संदेश यावेळी निसर्गप्रेमींनी देत निसर्गाला नारळ अर्पण केला.
यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, पोलीस निरीक्षक अप्पासाहेब मांजरे, मनसेचे तालुकाध्यक्ष नारकर, यादवराव देवकांत यांच्या हस्ते भंडार्‍यांची उधळण करीत ही पूजा पार पडली. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्गाने दिलेली देणगी तसेच सौंदर्य टिकून राहण्यासाठी झाडांचे संवर्धन केले पाहिजे, असे आवाहन जेजुरीहून आलेले भाविकांनी केले.
यावेळी अन्नदान सेवा ट्रस्टच्या वतीने परिसरातील महिलांना वनदेवी मानून साडी चोळी व तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यानंतर निर्सपूजेनंतर पालखी निवकणे मंदिराकडे पायवाटेने नेण्यात आली.
या पालखीचा निवकणे येथे तीन दिवस मुक्काम असतो. तालुक्यातील असणारे निसर्गसौंदर्य जतन करावयाचे असल्यास प्रत्येक डोंगरदर्‍यात राहणार्‍या लोकांकडून निसर्गाची पूजा केली जाते.