बालकलाकारांच्या विविध नृत्य प्रकारांनी वाढली रंगत
सातारा ः येथील शामसुंदरी चॅरिटेबल अॅन्ड रिलीजिएस सोसायटीच्या के.शामराव दासपय्या शानभाग विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन नुकतेच मोठया उत्साहात संपन्न झाले. या सोहळयासाठी दै. ग्रामोध्दारचे संपादक धनंजय उर्फ बापूसाहेब जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी लेखिका व योग शिक्षिका सौ. शंकुतला जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सलग तीन दिवस चाललेल्या या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळयासाठी चार्टर्ड अकांउटंट ओंकार कुलकर्णी, लेखक अमेय भागवत यांच्यासह विद्यालयाचे विश्वस्त विलास आंबेकर व सौ. आंबेकर यांची उपस्थिती होती. विदयालयाचे संस्थापक अध्यक्ष रमेश शानभाग व विश्वस्त सौ.उषा शानभाग यांनी मान्यवरांचे स्वागत केल्यावर शाळेतील के.जी. ते दहावीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनीनी विविध मनोरंजनपर वैयक्तिक, सामुहिक नृत्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला.
कोकणी नृत्य, कोळी नृत्य, जोगवा, शास्त्रीय नृत्य याशिवाय वेस्टर्न डान्स, वीर जवान, मॅा तुझे सलाम यासह मुलगी वाचवा तसेच श्री गणपती व बालकृष्णावर आधारित या नृत्यांच्या सादरीकरणावेळी उपस्थित पालक व बालचमूंनी टाळयांच्या गजरात दाद दिली.याच सोहळयात परिसर स्वच्छ ठेवा आणि प्रदूषण टाळा याचा संदेश देणारी एकांकिका तसेच मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील नाटयांक व गीते सादर करण्यात आली. इ. 2 री ते 4 थी च्या विद्यार्थ्यानी सादर केलेला अॅबॅकस डेमो विशेष लक्षवेधी ठरला.
यावेळी प्रमुख पाहुणे बापूसाहेब जाधव यांनी शाळेच्या स्थापनेपासून शाळेची होत असलेली शैक्षणिक आणि खेळाच्या प्रगतीचे कौतूक केले तसेच सातारा जिल्हयाच्या क्रिडा विभागासाठी शानभाग परिवाराने दिलेले योगदान मोलाचे आणि आदर्श असल्याचे नमूद केले. सौ.शकुंतला जाधव यांनी उपस्थित विदयार्थी आणि पालकांना योगासने, प्राणायामातून शारिरिक विकास आणि बौध्दीक विकास साधून त्याचा आपल्या शैक्षणिक जीवनात कसा फायदा होतो याचे सखोल मार्गदर्शन करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळेच्या विविध शैक्षणिक तसेच क्रिडा विभागात उत्तुंग काम करणार्या विद्यार्थी व खेळाडूंना स्मृती चिन्हे व चषक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.ओंकार कुलकर्णी यांनी आपल्या कारकीर्दीसाठी शाळेची आपल्याला होत असलेली सर्वांगिण मदत कशाप्रकारे होते याचे विस्तृत विवेचन करीत याच शाळेत आपण घालवलेल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. लेखक अमेय भागवत यांनी शाळेचा विद्यार्थी म्हणून बिरूदावली मिळवताना आपल्या वाटचालीत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेखनामध्ये कसा उपयोग झाला याचे वर्णन केले.
शाळेच्या सुमारे 60 कॉम्प्युटरद्वारे विद्यार्थ्याना दिल्या जात असलेल्या आधुनिक संगणक प्रणालीच्या उपक्रमाचे कौतूक सर्वच मान्यवरांनी केले. सोहळयाचे सुत्रसंचालन शाळेच्या संचालिका सौ. आंचल शानभाग-घोरपडे यांनी केले सर्वासाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाने या सोहळयाची सांगता झाली. समारंभाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड व भाग्येश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
(छाया : अतुल देशपांडे)