Wednesday, March 19, 2025
Homeठळक घडामोडीकिवळ गाव जलमित्र पुरस्काराने सन्मानीत

किवळ गाव जलमित्र पुरस्काराने सन्मानीत

मसूर ः किवळच्या आजुबाजूला पडणा-या पावसाचा थेंब न थेंब अडवून भूगर्भात मुरला जावा यासाठी शासनासह विविध संस्थांच्या सहकार्याने व एकजुटीच्या लोकसहभागाने कायम दुष्काळी हा ठपका गत 3 वर्षाच्या कामगिरीतून किवळ गावाने अखेर पुसून टाकला असून सातत्याने 3 वर्षे केलेल्या विविध कामा मुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया या गावाने साधल्याने नुकताच या गावाला महाराष्ट्र शासनाचा व्दितीय क्रमांकाचा राजमाता जिजाऊ व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सोलापूर येथील शिवछत्रपती सभागृहात झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात जलसंधारण मंत्री ना.प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे व विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र शासन, जैन इरिगेशन, सहयाद्रि सह.साखर कारखाना आदींसह विविध संस्थांच्या माध्यमातून किवळ गावाने सन 2013-14 व 2014-15 या वर्षात पाणी आडवा व पाणी जिरवा मोहिम हाती घेतली. शेतीला तर पाणी नाहीच पण पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून असणा-या या गावाने कंबर कसली. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत 50 हजार मिटर लांबीच्या ड्रीप सि.सी.टीचे काम केले. अनेक ठिकाणी बांध बंदिस्तीची कामे केली. 23 साखळी बंधारे उभारले, 45 मातीनाला बांध बांधले. 400 अर्दन स्ट्रक्चर बांध बांधले. ग्रामस्थांमध्ये ठिबक सिंचनाबाबत जागृती करण्याबरोबरच सलग 3 वर्षे मोठया प्रमाणात वृक्ष लागवाड करून वृक्ष संगोपनाचे काम युध्दपातळीवर केले. तर सन 2015-16 मध्ये शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत शासन, सहयाद्रि सह.साखर कारखाना, जैन इरिगेशन व लोकसहभागातून राज्यातला पहिला ओढाजोड प्रकल्प किवळ गावाने यशस्वी केला. त्याबरोबरच 10 दगडी सिमेंट बंधारे व खोलीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले. 23 माती नालाबांधाचा सांडवा दुरूस्ती करून खोलीकरण करण्यात आले. 3 गॅबियन बंधा-याबरोबरच तलाव्यातील गाळ काढून खोली वाढविण्यात आली अशी विविध कामे पुर्ण केल्याने पुर्वीपेक्षा 200 हेक्टर जादा क्षेत्र ओलिताखाली नेण्यास मदत झाली त्यामुळे लोकसहभागातून ऐतिहासिक कामे करणा-या किवळ गावास जिल्हास्तरीय जलसिंचन पुरस्कार मिळाला. त्यामुळे किवळच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
दरम्यान सोलापूर येथील कार्यक्रमात कराड पं.स.च्या सभापती सौ.शालन माळी, माजी पं.स.सदस्य डॉ. विजयराव साळुंखे,  सरपंच सौ. उषा साळुंखे, माजी उपसरपंच सुनिल साळुंखे, ग्रा.पंं.सदस्य रामराव साळुंखे, सुदाम चव्हाण, विमल जाधव, उषा नलवडे, कलावती माने, ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या पुरस्काराबद्दल किवळ ग्रामस्थांचे आ.बाळासाहेब पाटील, जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे, उत्पादन शुल्कचे उपायुक्त तानाजीराव साळुंखे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या सौ.संगीता साळुंखे व मान्यवरांनी अभिनंदन केले.
14 हजार लोकांनी दिली भेट..
कायम दुष्काळी शिक्का असलेल्या किवळ गावाने केलेली एैतिहासिक क्रांती पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुमारे 14 हजार लोकांनी गत 3 वर्षात भेट दिली आहे.
यावेळी किवळकरांनी केलेल्या विशेष कार्याचे अनेकांनी कौतुक केले.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular