सूर्योदयाच्या लालीबरोबर गुलालाची उधळण करून श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील पाच दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची सांगता 

????????????????????????????????????

महाबळेश्‍वर :  कृष्णाबाई माझे आई, मजला ठाव द्यावा पायी ,कृष्णाबाई महाराज की जय … च्या जयघोषात श्री क्षेत्रमहाबळेश्वर  येथे कृष्णाबाईच्या प्रतिमेची चांदीच्या पालखीतून  भल्या पहाटे निघालेली   पारंपारिक  मिरवणूक तसेच सूर्योदयाच्या  लाली बरोबर गुलालाची उधळण  करून श्री क्षेत्रमहाबळेश्वर येथील  सहा  दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची सांगता  आज मोठ्या दिमाखात करण्यात आली.  भल्या पहाटेचा हा नेत्र दीपक सोहळा शेकडोच्या संख्येने स्थानिकांसह परगावच्या भाविकांनी अनुभवला .यावेळी सारे वातावरण अत्यंत मंगलमय  व कृष्णाबाईमय  झाले होते .
कृष्णाबाई चा उत्सव कृष्णा नदी किनारी प्रती  वर्षी वाई,कराडसह अन्य भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मात्र या उत्सवाची सांगता श्री क्षेत्रमहाबळेश्वर येथे कृष्णेच्या  उगमस्थानी प्रती वर्षी पारंपारिक पद्धतीने भल्या पाहटे  साजरा होत असल्याने त्याला आगळे वेगळे महत्व आहे .शिवाय कृष्णा नदीच्या उगम स्थानाबरोबर श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे कोयना, वेण्णा,सावित्री,  गायत्री अश्या पाच नद्यांचे उगमस्थान असल्याने पंचगंगेच्या उगमस्थानातील  सांगता सोहळ्यास त्या दृष्टीनेही   विशेष महत्व आहे. श्री कृष्णादि पंचगंगा देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्रमहाबळेश्वर  यांच्या वतीने व सर्व क्षेत्रमहाबळेश्वर वासीयांच्या वतीने हा उत्सव प्रती वर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो .
फाल्गुन वद्य प्रतिपदेला श्री च्या प्रतिमेस सुवासिनीच्या हस्ते अभ्यंगस्नान घातले जाते. त्यानंतर तिची षोडशोपचारे  पूजा केली जाते व महा आरती नंतर  पंचगंगा मंदिरापर्यंत  तिची सवाद्य मिरवणूक  काढतात  याच सुमारास मंडप मध्ये उदकशांतीचा कार्यक्रम केला जातो त्यानंतर श्री कृष्णाबाईच्या प्रतिमेची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाते .दुसर्या दिवशी कृष्णाबाईस  श्रीसूक्त पठण केले जाते .तसेच अभिषेक करून धुपारती,  नैवेद्य  झाल्यावर रात्रो भजन कीर्तनाचा सुुश्राव्य कार्यक्रम असतो तसेच रात्रो विविध भजनी मंडळांचे भजन असते तर प्रतिपदा ते वद्य चतुर्थी पर्यंत सातारा येथील सु प्रसिद्ध प्रवचनकार- कीर्तनकार  ह.भ.प. भास्करबुवा काणे  यांचा किर्तनाच कार्यक्रम रात्री असतो.याच बरोबर चतुर्थीला श्री सुक्तासह  सहस्त्रावर्तने केली जातात .फाल्गुन वद्य पंचमीला श्रीसूक्त पठणा बरोबरच अभिषेक,धुपारती मंत्रपुष्पांजली व दुपारी सर्व  भाविकांसाठी  महाप्रसाद (प्रयोजन) तसेच सर्वच सुवासिनींसाठी हळद -कुंकू समारंभ आयोजित  केला जातो. तसेच ललितच्या पूर्व रात्रीला पंचगंगा मंदिराला विद्युत सजावट ,पुष्प सजावट तसेच भव्य व आकर्षक रांगोळ्या काढून  सर्व परिसर सुशोभित केला जातो  .व फाल्गुन वद्य षष्ठीच्या  उत्सवाच्या भल्या पाहटे होणार्‍या  सांगता सोहळ्यासाठी संपूर्ण श्री क्षेत्रमहाबळेश्वर वासीय रात्रीच सज्ज झालेले असतात .
येथील कृष्णाबाई उत्सवाच सांगता सोहळा अत्यंत अविस्मरणीय व नेत्र दीपक असतो .या दिवशी भल्या पहाटेच चार वाजण्याच्या सुमारास सारा गावच या सोहळ्या साठी आपापल्या मुलाबाळा सह शुचिर्भूत होऊन सज्ज असतो .भल्या पहाटेच श्रीकृष्णाबाई च्या प्रतिमेची चांदीच्या पालखीतून भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात येते .यासाठी आतिषबाजी ,व विविध वाद्यांची जय्यत तयारी असते . नगरप्रदक्षिणेच्या वेळी अंधार असल्याने पुढे टेम्बां त्यापाठोपाठ चांदीच्या पालखीत मोठ्या दिमाखात आरोढ झालेली कृष्णाबाईची पालखी .त्याच बरोबर दोन बाजूला सेवेकरी  सर्वात पुढे वाद्य वृंद व त्यांच्या जोडीला आतिषबाजी करीत नगर प्रदक्षिणा पुढे  पुढे जात असते . यावेळी    कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी ,कृष्णाबाई महाराज की जय  च्या जयघोषाणे सारा परिसर दुमदुमून गेलेला असतो .नगर प्रदक्षिणेचा मार्ग  पंचगंगा मंदिर ,समर्थ  रामदासस्वामी  स्थापित मारुती ,महाबळेश्वराचे शिव मंदिर ,कमलजा माता मंदिर ,अतिबलेश्वर मंदिर ,होळीचा माळ ,कोटेश्वर मंदिर व पुन्हा पंचगंगा मंदिर असा असतो .वाटेत सुवासिनी कृष्णाबाईच्या दर्शनासाठी व तिचे पूजन करण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने उभ्या असतात .पालखी पंच गंगा मंदिरात आल्यावर प्रसिद्ध कीर्तनकार भास्करबुवा  काणे  यांचे कृष्णाबाईच्या लळीताचे कीर्तन सुरु होते .त्यानंतर पंचगंगा कुंडातील पंचगंगा तीर्थाचे गंगा पूजन कीर्तनकार यांच्या हस्तेच करण्याची  येथे परंपरा आहे .याच वेळी नवस पूर्ती व नवीन नवस बोलणे चा कार्यक्रम होतो .यावेळी भाविकांनी वर्तविलेली मनोकामना पूर्णत्वाला जाते ,नवस फलद्रूप होतात अशी कृष्णाबाई भक्तांची श्रद्धा आहे. त्यानंतर बाळसंतोष( छोट्या छोट्या बालकांना आशीर्वाद देण्याचा  कार्यक्रम आसतो .गंगा पूजनाचे वेळी कुंडातील पाण्यामध्ये दिवे खेळविले जातात .यावेळचा सोहळा फारच अविस्मरणीय असतो .पूर्वी  या कुंडातील पाणी सर्व भक्तांनी हात पाय बुडविल्या मुळे खराब झालेले असते .मात्र उत्सवकाळात कुंडात कोणालाही उतरून दिले जात नाही वा हात बुडवून दिले जात नाहीत .पाणी स्फटीकासारखे शुभ्र व  स्वच्छ असते .शेवटी सूर्योदयाच्या  लाली बरोबर गुलालाची उधळण  करून सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची सांगता केली जाते.

1. उत्सव काळातील कृष्णाबाईची सालंकृत प्रसन्न व तेजस्वी मूर्ती

2.चांदीच्या पालखीतून कृष्णाबाईची नगर -प्रदक्षिणा सुरु असताना प्रदक्षिणा मार्गावर देवीचे दर्शन  घेण्यासाठी झालेली  महिला भक्तांची गर्दी .

(सर्व फोटोः संजय दस्तुरे ,महाबळेश्वर)