मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हे सूत्र ज्यांनी आपल्या वाणीच्या व लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत रुजवलं आणि परिवर्तनाच्या चळवळीला नव्या दमानं, नव्या उत्साहानं उभं केलं त्या वादळाचे नांव अण्णाभाऊ. व्यथा, वेदनांचे टाहो फोडणारा अस्सल लेखक आणि उत्तम लोकशाहीर म्हणून देशाच्या सीमा ओलांडत जगभर पोहचलेला आभाळ उंचीचा प्रतिभासंपन्न साहित्यसम्राट म्हणजे अण्णाभाऊ साठे !
प्रस्थापित व्यवस्थेने मागास ठरवलेली जात अण्णाभाऊंच्या वाट्याला आली. या जात व्यवस्थेचे चटके त्यांच्या कैक पिढ्यांनी वाटेगावपासून अनुभवले. झोपडपट्टीतलं किड्यामुंग्यांचं जगणं पाठीवर घेऊन गुदमरलेला श्वास कसा मुक्त करता येईल यासाठी अण्णाभाऊंची लेखणी अखेरपर्यंत राबत राहिली. अगदी वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत अक्षरांची ओळख नव्हती. केवळ दीड दिवसांची शाळा अण्णाभाऊंनी पाहिली. मात्र, असे असले तरी अफाट आणि अन् अचाट शब्दसामर्थ्याने उपेक्षित, वंचित, गरीब, कष्टकरी अशा सर्वहारा समुहाचा त्यांनी ठाव घेतला. हतबल जगणं, ठसठसणारं दुःख्ख आणि गलितगात्र परिस्थितीचा हुंकार बनून त्यांची लेखणी शब्द पेरत राहिली. या पेरणीने प्रस्थापित साहित्याला जबरदस्त हादरे दिले अन् अवघे साहित्यविश्व कवेत घेतले.
अहंकार, कुरुप, आग, फुलपाखरु, आघात, अग्निदिव्य, रानबोका, रुपा, रत्ना, वारणेचा वाघ, अलगूज, चिखलातील कमळ, चंदन, सैरसोबत, जीवंत काडतूस, आवडी, वैर, गुलाम, माकडीचा माळ, संघर्ष, फकीरा, वैजयंता अशा अनेकविध कांदबऱ्या आणि कितीतरी कथा, प्रवासवर्णने, लोकनाट्ये त्यांनी लिहून साहित्यात आगळीवेगळी मोलाची भर टाकली. अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे ख-या अर्थाने माणसांची भाषा. रशियासारख्या देशाने अण्णाभाऊंच्या लेखणीची दखल घेतली आणि त्यांचा यथोचित गौरव करुन मायभूमीत पाठवले. मात्र मायभूमीत त्यांची अखेरपर्यंत उपेक्षाच झाली. अण्णाभाऊंचा जन्मदिन हा महाराष्ट्र शासनाने खरंतर मराठी भाषा दिन म्हणून घोषित करायला हवा होता. कारण अण्णाभाऊ हेच मराठी साहित्यातले साहित्यसम्राट होत. त्यांच्या फकीरा या एकाच कांदबरीने साहित्यविश्वाला अक्षरशः जिंकले आहे. आज ती कांदबरी अजरामर ठरलीय, हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारु शकत नाही. त्यांच्या एकूणच अक्षरवाड़याच्या श्वासात परिवर्तनाचा प्रचंड ध्यास होता हेही नव्याने सांगण्याची आता गरज नाही. झोपटपट्टीत रहाणा-या आणि केवळ दीड दिवसांची शाळा पाहिलेल्या एका व्यक्तीकडून एवढं अस्सल बावनकशी कसदार साहित्य निर्माण होणं हे खरंतर आश्चर्यजनक आहे. किंबहुना म्हणूनच अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिनाचे हक्कदार आहेत, हे वास्तव महाराष्ट्राने मोठ्या आणि खुल्या मनाने मान्य करायला हवे.
वास्तविक अण्णाभाऊंच्या लेखणीत जेवढे सामर्थ्य होते, तेवढेच त्यांच्या वाणीतही होते. त्यांनी अगणित पोवाडे, लावण्या सादर करुन शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ पुढे नेली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, राज्य निर्मितीत लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊंचा सिंहाचा सहभाग राहिला. ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ यासारख्या लावणीने महाराष्ट्राच्या कानात क्रांतीची उर्जा भरली. दबलेली, पिचलेली, मने क्रांतीच्या विस्तवांनी पेटवणं आणि त्यांना परिवर्तनाच्या चळवळीत दाखल करणं यासाठी अण्णाभाऊंचा प्रत्येक शब्द विस्तव होऊन बरसत राहिला.
अण्णाभाऊ देव, दैव आणि दैववाद नाकारत होते. मानवतावादाचे थोर पुरस्कर्ते होते. विज्ञाननिष्ठा त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती. म्हणूनच त्यांनी धर्मांधतेच्या भोंगळवादी व खुळचट कर्मकांडातून बाहेर पडण्यासाठी ‘घाव’ घालण्याचे आवाहन केले. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा त्यामागची त्यांची नेमकी ओढ ही बुध्दाकडे जाण्याची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. बुध्दाच्या गावाला गेल्याशिवाय देव, दैव, दैववाद कर्मकांड आणि अंधश्रध्दा नाकारता येणार नाही. परिणामतः रंजलागांजलेला हतबल अवस्थेतला समाज विवेकवादाकडे, विज्ञानवादाकडे झूकणार नाही अशी त्यांची धारणा होती. मात्र अण्णाभाऊंच्या मृत्यूनंतर तथाकथित विचारवंतांनी आणि पुढाऱ्यांनी अण्णाभाऊंची ‘घाव’ घालण्याची भूमिका आजवर स्पष्टपणाने पुढे येऊ दिली नाही. साम्यवादाचे प्रस्थापक कार्ल मार्क्स याचा अण्णाभाऊंच्यावर जरुर प्रभाव होता. परंतु मार्क्सच्या विचारधारेतला केवळ ‘समाजवाद’ त्यांना पुरेसा वाटत नव्हता. भवतु सब्बं मंगलंम् या बुध्द स्वरातला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिपादलेला ‘लोकशाही समाजवाद’ अण्णाभाऊंना अधिक महत्वाचा वाटत होता. त्यामुळे अण्णाभाऊंना व्यवस्थित समजून घेतले पाहिजे आणि समजून घेता घेता माणसाला सांस्कृतिक अन् सामाजिकदृष्ट्या गुलाम करणाऱ्या व्यवस्थेवर ‘घाव’ घातला पाहिजे. अण्णाभाऊंच्या या जयंतीच्या पार्श्वभूमीवर केवळ अभिवादन करुन भागणार नाही, तर ‘घाव’ घालण्याच्या महत्वपूर्ण क्रांतीकार्याला जाणिवेच्या आणि नेणिवेच्या पातळीवर आरंभही झाला पाहिजे. कारण बुध्दाच्या गावाला त्याशिवाय जाता येणार नाही, हे मात्र निश्चित !
अ रु ण जा व ळे
९८ २२ ४१ ५४ ७२