वडूज : येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरपंचायतीच्या वित्त व नियोजन समितीचे सभापती अनिल माळी यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनातील माहितीनुसार, गेल्या महिनाभरात निवडणूकीच्या कामकाज व अन्य कारणांमुळे मुख्याधिकारी श्री. खांडेकर हे नगरपंचायत कार्यालयात आठवड्यातून एखादा दुसरा दिवस येत आहेत. श्री. खांडेकर कार्यालयात उपस्थित नसल्याने दाखले, उतारे व अन्य कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यांच्या निष्क्रीयतेमुळे घरकुल व अन्य लहान मोठ्या योजनांची बिले रखडली आहेत. घरकुलाच्या कामात वाळू परवाना मिळवून देण्याची जबाबदारी मुख्याधिकार्यांची असूनही या कामांत ते वेळकाढूपणा करीत आहेत. तसेच त्यांच्या उदासिनतेमुळे पूर्ण अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांची बिले व गेली दिड महिना कर्मचार्यांचा मासिक पगार रखडला आहे. परिसरावर दुष्काळी परिस्थितीचे सावट आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या येरळवाडी तलावात पाणी असतानाही नगरपंचायत प्रशासनाचे पाणी पुरवठा कर्मचार्यांवर नियंत्रण नसल्याने एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आठ दिवसांनी होत आहे. नाथ मंदिर, पेडगाव रस्ता व अन्य काही ठिकाणी पाईप लाईन, व्हॉल्वला गळती असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. लाखो रूपये खर्चुन मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी बांधूनही लोकांना आवश्यक तेवढा पाणी पुरवठा होत नाही.
शहरातील आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात विटा येथील एका संस्थेस महिना पाच लाख रूपयांचा ठेका देण्यात आला आहे.मात्र संबंधितांकडून म्हणावी तशी स्वच्छता होत नाही. अनेक ठिकाणी घंटा गाडी चार- पाच दिवस जात नाही. गटारे तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही योग्य प्रकारे स्वच्छता ठेवली जात नाही. नगरपंचायतीने स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत भाग घेतला होता, स्पर्धेच्या कालावधीपुरती दिखावू रंगरंगोटी करण्यात आली. स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर स्वच्छतेचा बोजवाला उडाला आहे. नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर, दक्षिण मळवी, संजय नगर, गुंडाप्पाचा मळा, मसोबाचा मळा, नागमळा, चिंचेचा मळा, माधवनगर, निसळबेंद, वायदेशी वस्ती, कांता मामाचा मळा व अन्य काही वस्त्यांना नगरपंचायतीची पाणी पुरवठा योजना अद्याप सुरू झाली नाही. येथील विहीरी कोरड्या व हातपंप बंद आहेत. त्या त्या प्रभागांतील नगरसेवकांनी मासिक बैठकीत ठराव मांडूनही मुख्याधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. मुख्याधिकार्यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन तातडीची बैठक घेणे गरजेचे होते, मात्र त्यांनी कसलीही ठोस उपाय योजना न केल्याने वस्त्यांवर दुष्काळाची प्रचंड दाहकता निर्माण झाली आहे.
या वस्त्यांवरील नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांसाठी चार्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उंबर्डे फाट्यावरील उरमोडीच्या दार्यातून व दुसर्या दार्यातून कालव्याचे पाणी सोडण्यासंदर्भात नगरपंचायतीने विज बिलाची तरतूद करावी.
या सर्व प्रकारास जबाबदार असणार्या मुख्याधिकारी खांडेकर यांची सखोल चौकशी करून त्यांची बदली करावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही माळी यांनी दिला आहे.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणीः अनिल माळी
RELATED ARTICLES