माटेकरवाडीच्या कन्येचा चित्रपटसृष्टीत गाजतोय आवाज

तळमावलेः नुकताच कागर या चित्रपटातील रिंकू राजगुरु हिच्यावर चित्रीत झालेल्या दरवळ मव्हाचा आणि तांडव या चित्रपटातील जय भवानी आणि जय शिवाजी व इतर गाणी सर्वत्र वाजत आहेत. ही गाणी माटेकरवाडीतील कविताने गायली आहेत. चित्रपट सृष्टीचे तसे सर्वांनाच आकर्षण. याच क्षेत्रामध्ये आपल्या जादुई आवाजाने वेड लावले आहे ते कविताने. माटेकरवाडीच्या कविताने आपल्या आवाजाची मोहिनी सर्वांवर घातली आहे.
कविता राम यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई या ठिकाणी झाले आहे.शालेय वयात असतानाच त्या या क्षेत्राकडे आकर्षित झाल्या. इ.7 वीत असताना त्यांनी आंतरशालेय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तर अरुण दाते आणि राणी वर्मा परीक्षक असलेल्या राज्यस्तरीय गायनस्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवला. शाळेत असताना एकांकिका, अभिनय अशा अनेक स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनेक स्पर्धेत त्यांनी पारितोषिके मिळवली आहे. अभिनय, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत असताना बर्‍याच शिक्षकांनी तूझा आवाज गोड आणि चांगला आहे, या क्षेत्रात तू करियर कर असे सांगीतले. त्यामुळेच आपण या गायनाच्या क्षेत्रात आल्याचे कविता राम म्हणाल्या.
कविता राम यांनी इ.8वी मध्ये असताना पहिला स्टेज शो केला. यावरुन आपणांस त्यांच्या कला क्षेत्रातील प्रतिभेची जाणीव झालेली दिसून येते. घरामध्ये कोणतेही कलाविषयक वातावरण नसताना त्यांनी या क्षेत्रात केलेली वाटचाल आणि मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. घरामध्ये सर्वात मोठी असल्यामुळे घराची जबाबदारी जाणिवपूर्वक आणि कौशल्यापूर्वक पेलली आहे. अनेक वर्षापासून कविता विविध प्रकारचे स्टेज शो, कार्पोरेट कार्यक्रम, प्रॉडक्ट लॉजिंग प्रोग्रॅम मुंबई व परदेशात करत आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 2000 च्या वरती शोज केले आहेत. त्यांच्याकडे बॉलिवूड, पंजाबी, पॉप साँग गाण्याची क्षमता आहे. अनेक मराठी-हिंदी गाण्याचे अल्बम त्यांच्या नावावर आहेत. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना उच्चशिक्षण व गाण्याचे शास्त्रीय शिक्षण घेता आले नाही याची खंत त्या व्यक्त करतात, पण स्मरणशक्ती चांगली असल्याने त्यांनी यावर मात केली असून त्या सध्या विरेन सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतील संगीताचे शिक्षण घेत आहेत.
या कला क्षेत्राकडे जाण्यासाठी संपूर्ण कुटुंबियांचा विरोध असताना आई सौ.अलका माटेकर, आजी कै. विमल धनू (धनू)यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला असल्याचे त्या सांगतात.