सातारा / प्रतिनिधी :- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा -शाहूपुरीच्यावतीने महाकवी कालिदासदिनानिमित्ताने आयोजित केलेला आणि चौघीजणी समूहाने प्रस्तुत केलेला पर्जन्यसूक्त कार्यक्रम प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये झाला. या कार्यक्रमाला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या पावसाळी कवितांमध्ये सातारकर रसिक चिंब झाले.
हा कार्यक्रम शुभांगी दळवी, डॉ. आदिती काळमेख, शुभांगी मदने, सविता कारंजकर यांनी सादर केला. कवितांची अप्रतिम निवड, उत्कृष्ट संहिता, बहारदार सादरीकरण आणि सुरेल गायन यांमुळे कार्यक्रम उंचीवर पोचला. अनेक कवींच्या पावसावरील कविता सादर करुन रसिकांना चिंब केले. सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. आदिती काळमेख, शुभांगी मदने, सविता कारंजकर यांना बालकवी बा.भ.बोरकर, सदानंद रेगे, अनिल या जुन्या जाणत्या कवींसह निलेश पाटील, अभिजित साळुंखे, लता चव्हाण अशा नवीन पिढीतील कवींच्या कविता सादर केल्या. शुभांगी मदने यांनी यावेळी ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘नाच रे मोरा’, ‘आला आला वारा’ अशी काही पाऊस गाणी सुरेल आवाजात गाऊन रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रम सादर करणाऱ्या कवियत्रींनी काही स्वत:च्या कविता सादर केल्या. कविता सादर होत असताना पडद्यावर संबंधित कवितेचे शब्द आणि त्याला अनुरुप चित्र पाहायला मिळाल्याने रसिकांना वेगळा अनुभव घेता आला. कवितांची निवड अतिशय उत्तम होती. दर्जेदार कवितांचा समावेश हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. सादरीकरणात दीड तास कधी-कसा निघून गेला हे रसिकांच्याही लक्षातही आले नाही. भर पावसात सातारकरांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत आणि रसिक या शब्दपावसात न्हाऊन निघावेत, अशी अपेक्षा यावेळी सातारकर रसिकांनी व्यक्त केली.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने विनोद कुलकर्णी आणि डॉ. संदीप श्रोत्री यांनी सादरकर्त्या कवियत्रींचा सत्कार केला. प्रास्ताविक मसाप शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले तर आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. याप्रसंगी डॉ. उमेश करंबेळकर, किशोर बेडकिहाळ, चंद्रकांत कांबिरे, डॉ. राजेंद्र माने, सागर गायकवाड, मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.
मसाप, शाहुपुरी शाखेच्या ‘पर्जन्यसुक्त’ कार्यक्रमास सातारकरांचा प्रतिसाद
RELATED ARTICLES