Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीआरक्षणासाठी गरजल्या सावित्रीच्या लेकी स्क्रीप्ट, ऑडिशन टेस्टला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आरक्षणासाठी गरजल्या सावित्रीच्या लेकी स्क्रीप्ट, ऑडिशन टेस्टला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा : आम्ही जिजाऊच्या लेकी आता सज्ज झालो आहे. कोणतीही आव्हाने असोत अथवा कोणतेही संकट असो. आमची लढाई आता थांबणार नाही.. आम्ही एका नव्या क्रांतीसाठी सज्ज आहे… जय भवानी, जय शिवाजी, जय मराठा, एक मराठा… लाख मराठा…ही वाक्ये कोणत्या सभेतील अथवा कोणत्या सभामंचकावरील नाहीत तर ती आहेत सातारा जिल्ह्यात निघणार्‍या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार्‍या अनेक युवतींची. निमित्त होते मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने निवेदन वाचण्यासाठी ज्या मुलींची निवड करण्यात येणार होती त्यांच्या स्क्रीप्ट आणि ऑडिशन टेस्टचे. एक मराठा… लाख मराठा अशी घोषणा देत आणि मी जिजाऊची लेक अशी साद घालत सातारा जिल्ह्यातील 35 हून अधिक युवतींनी मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने आपली स्क्रीप्ट आणि ऑडिशन टेस्ट दिली. प्रत्येक युवती अगदी त्वेशाने आणि जोशपूर्ण आवेशात आपली भूमिका मांडत होती. प्रचंड असा उत्साह आणि प्रत्येक युवतीच्या अंगामध्ये संचारलेला मराठा क्रांतीचा उत्साह पाहून परिक्षकही भारावून गेले.
सातारा येथील मराठा क्रांती मोर्चा दि. 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. येथील मोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत ठरावा यासाठी जिल्हा समन्वय समिती आणि सकल मराठा समाज झपाटून कामाला लागली आहे. अबालवृध्द आपली भूमिका सर्व समाजाला पटवून देत मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार असल्याचे अगदी ठामपणे सांगत आहे. काही झालेतरी मी तर सहभागी होणारच आहे आणि तुम्हीही यामध्ये सहभागी व्हायचे, असेच प्रत्येकजण सांगत आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिलाही मागे नाहीत. मराठा क्रांती मोर्चामध्ये अग्रभागी असणार्‍या पाच युवती मराठा क्रांती मोर्चा का आणि त्यामागची कारणे त्याचबरोबर आपली भूमिका मांडणारे एक निवेदन सादर करणार आहेत. हे निवेदनही तितक्याच ताकदीचे आणि समाजमनावर परिणामकारक असे असावे त्याचबरोबर त्यातून सकल मराठा समाजाचा हुंकार बाहेर पडावा, अशी भूमिका यामागे आहे. या तयारीचा एक भाग म्हणून तीन दिवसांपूर्वी जिल्हा समन्वय समितीने ऊसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानूसार सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा कार्यालयात स्क्रीप्ट आणि ऑडिशन टेस्ट झाली. दुपारी एक वाजता सुरु झालेल्या या  स्क्रीप्ट आणि ऑडिशन टेस्टचा कार्यक्रम जवळपास दोन तास चालला. सहभागी युवतींना प्रत्येकी दोन मिनिटे बोलण्याची संधी देण्यात येत होती.
दोन मिनिटांमध्ये प्रत्येक सहभागी युवती अगदी आवेशात आपली भूमिका मांडत होती. मराठा क्रांती मोर्चा का आणि कशासाठी, कोपर्डी घटना, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्त्या त्याचबरोबर मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण या सर्व बाबींचा उहापोह केला जात होता. चौथीमध्ये शिक्षण घेणार्‍या लहान मुलींपासून ते अगदी महाविद्यालयीन स्तरावरील युवती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे यापैकी अनेक युवतींनी आपल्यालाच संधी मिळाली पाहिजे, यासाठी गेले चार दिवस तयारीही केली होती. जिजाऊ, शिवरायांना अभिवादन करुन प्रत्येक युवती पुढे येत होती आणि दोनच मिनिटांमध्ये आपली भूमिका मांडत होती. मराठा क्रांती मोर्चा का निघतोय, कोपर्डी घटनेचे विवेचनही अनेक युवतींनी दोन मिनिटांत केले. थोरला भाऊच आता अडचणीत आहे त्यामुळे त्याला हात देण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. लहान भावानेही आता आपल्यासाठी मदतीचा हात द्यावा, अशी मागणीही आपल्या निवेदनामध्ये काही मुलींनी केली. जवळपास दोन तास  स्क्रीप्ट आणि ऑडिशन टेस्टचा कार्यक्रम सुरु होता. युवती अगदी जोशामध्ये आपली भूमिका मांडत होत्या. अगदी शिस्तबध्द आणि एका रांगेत उभे राहून येथे उपस्थित मराठा बांधव अगदी शांतपणे ऐकत होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular