साताऱ्यात मराठा युवकांचा स्वप्नभंग ; राज्यकर्त्यांबद्दल तीव्र नाराजी  

सातारा दि ५ : राज्यात बहुसंख्येने मराठा बांधव आहेत, राज्याची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मराठा हुकमी एक्का समजला जातो. पण, आज आरक्षणाबाबत  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने मराठा युवकांचा स्वप्नभंग झाला आहे, सर्व पक्षीय राजकारणी व त्यांची हुजरेगिरी करणारे मराठा कार्यकर्ते याला जबाबदार असल्याची भावना युवकांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

गेली अनेक वर्षे महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, शिवसंग्राम  व इतर संघटनांनी वैचारिक पेरणी केली होती. आदरणीय आण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार, विनायक मेटे, माजी मंत्री डॉ शालिनीताई पाटील यांनी उघडपणे       समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पाऊल उचलले होते. सेवानिवृत्त न्यायाधीश पी बी सावंत यांनी घटनात्मकरित्या व लोकशाही मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळवावे लागेल असे सूचक विधान केले होते. पण, सर्वच राजकीय पक्षांनी आपले आरक्षण चळवळीला योगदान दिले आहे. हे भासविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात मराठा क्रांती मोर्चा ही संघटना म्हणजे युवकांचा आवाज मानला गेला होता.                         सातारा शहरात पाच वर्षांपूर्वी दि ३ऑक्टोबर रोजी सुमारे तीन लाख लोकांचा शांततेत मोर्चा काढण्यात आला. इतर समाज्याने जाहीर पाठींबा देऊन हातभार लावला होता. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वांचाच भ्रमाचा भोपळा फुटला असून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.                                       मुळातच  कोपर्डी ता कर्जत जि अहमदनगर येथील मराठा भगिनीवर झालेला अत्याचार व खून यामुळे सर्व समाज घटक पेटून उठला होता, मराठा समाज सर्वाधिक संतप्त झाले होते. आरोपाला फाशी देण्यात यावी या मूळ  मागणी नंतर अचानक मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणखी एक मागणी पुढे आली आणि हीच मूळ मागणी बनली, त्याचे पडसाद उमटले होते, राजकर्त्यांनी आपआपल्या सोयीनुसार निकष काढले, काहींनी विधिमंडळ सभागृहात एकमुखी ठराव मांडला. समर्थकांनी पेढे वाटले, पोष्टर बाजी सुरू झाली. वाहनांचे स्टिकर गडद झाले, पण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण निकालावर राजकीय झुल अंगावर असल्याने बोलताना समर्थन व विरोध दिसू लागला आहे, उच्च न्यायालय म्हणजे राज्य सरकार व सर्वोच्च न्यायालय म्हणजे केंद्र सरकार असा काहींनी जावईशोध लावण्यास ही मागे पुढे पाहिले नाही,       राज्यात सधन मराठा समाजातील फक्त  सुमारे ४५घराणी सर्व क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या मध्येच नातेसंबंध निर्माण होतात. इतर गरीब व स्वाभिमानी, कर्तबगार युवकांना संधी मिळत नाही. अशा मराठा युवकांना आता कोणीही वाली राहिला नाही. अशी खंत साताऱ्यातील मराठा तरुण शहाजी गुजर,विजय महाडिक,विकास भिलारे, संजय पवार,  समीर  मोरे यांच्या सारख्या मराठा तरुणांना अस्वस्थ करू लागली आहे.                                 सातारा जिल्ह्यातील मराठा तरुणांनी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी जातीचे शेकडो प्रमाणपत्रे तहसिल व प्रांत कार्यालयातून काढून घेतले आहेत, त्याचा उपयोग होणार का? असा मार्मिक सवाल अजित निकम, हेमंत कदम, संजय जाधव यांच्या सारख्या पालकांना पडला आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे याची सर्व जातीधर्माच्या मित्र मंडळाची प्रामाणिक इच्छा होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्यास लावणार ठरला आहे. घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी मराठा समाजातील गरिबांना ही आरक्षण मिळावे ही भूमिका मांडली होती. तिला काही धनदांडग्यानी स्पष्ट पणे नकार दिला होता. आज सर्वानाच आरक्षणाचे महत्त्व लक्षात आले आहे. वाढत्या खाजगीकरणाने जात लोप पावली असून गुणवत्ता श्रेष्ठ समजली जात आहे. त्यामुळे आता सर्व रोजगार क्षेत्रात करिअर करण्यासाठी मराठा युवकांनी पुढे आले पाहिजे, शेतीसाठी जसा ‘वारगुळा’ आवश्यक आहे तशा पद्धतीने इतर समाज्याच्या पारंपरिक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा असा मतप्रवाह मांडण्यात येऊ लागला आहे