वीज मंडळाच्या कार्यालयातील ‘रिंगटोन बंद’चे शाहूपुरी वीज ग्राहकांकडून स्टिंग ऑपरेशन

सातारा : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहक संतुष्ट नाहीत, ही बाब आता भारनियमनासारखी स्विकारली आहे. पण सर्वसामान्य ग्राहकांची तक्रारच ऐकू येवू नये यासाठी वीज मंडळाच्या करंजे येथील कार्यालयातील फोनची रिंगटोनच बंद केल्याची धक्कादायक बाब शाहूपुरी ग्रामस्थांनी स्टिंग ऑपरेशनमधून उघड केली. ग्राहकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर अधिकार्‍यांनी डोळे उघडे ठेवून ही बाब पाहिल्यानंतर तशी लेखी कबुली दिली. आता या प्रकारावर वीज मंडळाचा प्रकाश पडतो, की अंधारातच ही तक्रार गायब होते याकडे लक्ष लागले आहे.
शाहूपुरी येथील गंगासागर कॉलनी, आझाद नगर परिसरात गेले चार दिवस पाण्याचा ठणठणाट आहे. त्यातच अपुर्‍या दाबाने वीजपुरवठा होत असल्याने सुमारे 200 कुटूंबियांना स्वत:च्या मालकीच्या बोअरचे पाणीसुद्धा उचलता येत नाही. तसेच काहींना दळणसुद्धा बाहेरुन आणावी लागत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अहिंसा मार्गाने लढा देणारे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज वीजग्राहकांनी थेट वीज वितरणच्या कार्यालयात धडक मारली. सुमारे अडीचशे महिला-पुरुष व युवक यांनी ग्रा. पं. सदस्य नवनाथ जाधव, संभाजी इंदलकर, मेघा चांदणे यांच्या नेतृत्वाखाली वीज मंडळाचे अधिकारी शितल डोळे यांना चांगलाच जाब विचारला. वीज कमी दाबाने उपलब्ध होत असताना एखाद्या वयोवृद्ध ग्राहकाने सतत फोनवर विचारणा केली असता राँग नंबर सांगणे, त्यानंतर फोनची रिंगच बंद करुन ठेवणे ही बाब स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणली. याठिकाणी काही कंत्राटी कामगार काम करीत असून त्यांच्याकडे वीज मंडळाचे बिल वसुल करण्याचे व कार्यालयीन कामकाज पाहण्याचे काम आहे. त्यांनी फोनची रिंग बंद करुन ठेवल्याची बाब अधिकार्‍यांनीही स्वत: अनुभवली व तशा स्वरुपाचे लेखी म्हणणे दिले आहे व सर्व पूर्ण लाईन तपासून जम्प बदलून देणे, थ्री फेज लाईन करुन देणे, फोनची रिंग बंद करण्याबाबत भविष्यात मी स्वत: काळजी घेईन, सर्व तक्रारींचे निवारण आठ दिवसांत करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन दिल्यामुळे मोर्चाची सांगता करण्यात आली.
आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती असल्यामुळे संतप्त युवकांना ज्येष्ठ नागरिकांनी शांत करत कार्यालयाला टाळे ठोकण्यापासून रोखले. तसेच यापुढे ही बाब खपवून घेणार नाही, असा गर्भित इशारा दिला. आज सकाळपासूनच पाण्यासाठी महिलांनी एकमेव असलेल्या हातपंपावर मोठी गर्दी केली होती. दुपारनंतर हातपंपावरुन आणलेल्या पाण्यामुळे महिलावर्गाने स्वयंपाकाला सुरुवात केली. या भागामध्ये राष्ट्रवादीचे खासदार व आमदार यांचे मोठे प्राबल्य आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारी शाहूपुरी ग्रामपंचायत आहे. परंतू नागरी सुविधांबाबत पूर्ण अपयश आल्यामुळे येथील स्थानिकांनी कोंडवे ग्रामपंचायतीला हा परिसर जोडावा, अशी मागणी केलेली आहे. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक एस. बी. मुजावर, एन. आर. जाधव, मालन सोनावणे, पल्लवी निकम, संजीवनी घोरपडे, उज्वला बाबर, मंगल पवार, संजय शिंदे सहभागी झाले होते.