नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांच्या सनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांच्या सरकारमध्ये आता सहा वकील, एक कर्करोग सर्जन आणि पीएच. डी. पदवीप्राप्त फिलॉसॉफरचा समावेश झाला आहे.
याशिवाय, चार मंत्री पदव्युत्तर, पाच पदवीधारक आणि दोघे जण अंडरग्रॅज्युएट आहेत. ज्या सहा वकिलांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यात पी. पी. चौधरी (सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात वकील), विजय गोयल, फग्गनसिंह कुलस्ते, अर्जुन राम मेघवाल, एस. एस. अहलुवालिया आणि राजन गोहेन यांचा समावेश आहे.
सुभाष रामाराव ब्रह्मे हे मोदी सरकारमध्ये वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले एकमेव डॉक्टर असून, कर्करोगावरील शस्त्रक्रियेत विशेषज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. कृष्णा राज, अनुप्रिया पटेल, सी. आर. चौधरी आणि अनिल माधव दवे यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, एम. जे. अकबर, रमेश जिगाजिनागी, जसवंत सिंह भाभोर, पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडविया हे पदवीधर आहेत. तर, महेंद्र नाथ पांडे हे मोदी सरकारमध्ये एकमेव फिलॉसॉफर आहेत. त्यांनी हिंदीमध्ये पीएच. डी. केली आहे. अजय टाम्टा आणि रामदास आठवले हे अंडरगॅ्रज्युएट आहेत. लोकसभा आणि राज्यसभेच्या वेबसाईटवरून ही माहिती प्राप्त झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात 50 पेक्षा कमी वय असलेल्या पाच मंत्र्यांचा समावेश करून युवकांना जास्तीतजास्त वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी मोदी यांनी अनुभवालाही प्राधान्य देत 60 पेक्षा जास्त वय असलेल्या 10 मंत्र्यांनाही समाविष्ट केले आहे.
अनुप्रिया पटेल या केवळ 35 वर्षांच्या असून, मोदी सरकारमध्ये आज समावेश झालेल्या त्या सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत. अजय टाम्टा हे 43 वर्षांचे आहेत. तर, गुजरातमधील भाजपाचे राज्यसभा सदस्य मनसुखभाई मांडविया हे 44 वर्षांचे आहेत. पुढील वर्षी गुजरातमध्येही विधानसभेची निवडणूक होत आहे. उत्तरप्रदेशच्या शाहजहानपूर येथील भाजपाच्या खासदार असलेल्या कृष्णा राज 49 वर्षांच्या आहेत, तर गुजरातमधील भाजपाचे खासदार जसवंत सिंह भाभोर हे पुढील महिन्यात पन्नाशी गाठणार आहेत