Sunday, June 1, 2025
Homeताज्या घडामोडीनरेंद्र पाटील मारणार विजयी षटकार

नरेंद्र पाटील मारणार विजयी षटकार

कराड : शिवसेना-भाजप महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी सकाळी कराडच्या शिवाजी स्टेडियमवर तरुणांसोबत क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. त्यानंतर त्यांनी प्रीतिसंगम बागेमध्ये जाउन प्रीतिसंगम हास्य क्लबच्या ज्येष्ठ सदस्यांसमवेत हास्ययोग करत त्यांना आपल्या उमेदवारीमागील भुमिका स्पष्ट करुन सांगितली.
सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आता अंतिम 4 दिवस बाकी असल्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी अखेरच्या टप्प्यात निर्णायक ठरु शकणार्‍या कराड शहर आणि तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गुरुवारी पहाटे नरेंद्र पाटील यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष शशिकांत हापसे तसेच भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांसमवेत शहरातील व्यायामाच्या ठिकाणांना भेटी दिल्या. यावेळी नरेंद्र पाटील यांनी शिवाजी स्टेडियमवर जाउन आपल्यातील क्रिकेटमधील कौशल्याचेही प्रदर्शन घडवून दिले. त्यांनी तरुणांसमवेत क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर त्यांनी प्रीतिसंगम बागेत हास्ययोग करणार्‍या प्रीतिसंगम हास्य क्लबच्या ज्येष्ठ नागरिकांसमवेत शहरातील विकास प्रश्‍नांबाबत चर्चा करताना स्वत:ही हसण्याचे धडे गिरवले.
याप्रसंगी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असूनही विद्यमान खासदारांनी कराडकडे गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने दुर्लक्ष केले आहे. कराडसाठी माझ्या डोक्यात अनेक योजना आहेत, ज्यांची अंमलबजावणी करण्यासाठी येथील नागरिकांनी मला साथ देण्याची गरज आहे. कराड परिसरात कोणताही मोठा उद्योग नसल्यामुळे येथील तरुणांना नोकरीसाठी पुण्या-मुंबईला स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील एमआयडीसी सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कराड तालुक्यात पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होउ शकते. त्यामुळे येथील नागरिकांनी मला साथ दिल्यास येथील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी माझे प्राधान्य राहणार आहे.
भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी म्हणाले, महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना कराडसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील मतदारांच्याकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यावेळी नरेंद्र पाटील हेच विजयाचा षटकार मारणार यात कोणतीही शंका नाही. नरेंद्र पाटील यांच्याकडे सातारा जिल्ह्याच्या संपूर्ण विकासाचा प्लॅन तयार आहे. त्यामुळे मतदारांना त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा नरेंद्र पाटील पूर्ण करतील असा आपल्याला विश्‍वास आहे. नरेंद्र पाटील यांच्या विजयासाठी भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलाने परिश्रम करत आहेत. त्यामुळे आता नरेंद्र पाटील यांना विजयाचे किती मताधिक्य मिळते एवढीच उत्सुकता राहिली आहे.यावेळी धनंजय खोत, श्री पेंढारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular