Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीउदयनराजेंकडून येरवळेचे पालकत्व केवळ वाळू उपशासाठी

उदयनराजेंकडून येरवळेचे पालकत्व केवळ वाळू उपशासाठी

कराड ः पंतप्रधान ग्राम दत्तक योजनेंतर्गत खा. उदयनराजे भोसले यांनी कराड तालुक्यातील येरवळे गाव दत्तक म्हणून घेतले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी या पालकत्वाचा उपयोग गावाचा कायापालट करण्यासाठी न करता केवळ वाळू उपशासाठी केला आणि ग्रामस्थांना वार्‍यावर सोडले, अशी टीका शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली.
कराड तालुक्यातील विंग येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले, सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष विक्रम पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदारांच्याकडे जाण्यासाठी लोक घाबरतात. त्यांच्या कलाकारीपुढे आपली समस्या मांडायची की नाही असा प्रश्‍न लोकांना पडतो. तरीही ते आपली कोणावरही दहशत नसल्याचे सांगत असतात. त्यांनी एक पत्रकार परिषद घेउन आपल्या खासदारकीतील विकासकामांचे प्रगतीपुस्तक सादर करावे. मी ही विधानपरिषद सदस्य म्हणून केलेल्या कामांचे प्रगतीपुस्तक जाहीर करेन. त्यांच्यापेक्षा मी अधिक पैशांची विकासकामे केली आहेत.. वर्षाला 5 कोटीचा खासदार निधी असतो म्हणजे 5 वर्षांत एकूण 25 कोटी रुपये विकासकामांसाठी मिळत असतात. हा निधी 10 विधानसभा मतदारसंघात विभागला असता तर 30 ते 40 गावांमध्ये भरीव विकासकामे करता आली असती. परंतु खासदारांनी 25 कोटींपैकी फक्त 12 कोटी रुपये वापरले.
उलट ते 17 हजार कोटींची विकासकामे केल्याचा दावा करत आहेत. 17 हजार कोटी वापरले असते तर सातारा जिल्ह्याचे नंदनवन झाले असते. सातार्‍यात झालेली विकासकामे ही केवळ केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातूनच झाली आहेत. खासदारांनी खोटे बोलून त्याच्यावर दावा सांगू नये. सातारा जिल्ह्यातील समस्यांवर बोलायचे सोडून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चा करत असतात. सातार्‍याचा सर्वांगिन विकास करण्यासाठीच माझी उमेदवारी आहे. मला मतदारांनी फक्त पाचच वर्षे संधी द्यावी.
यावेळी बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, नरेंद्र पाटील यांच्या रुपाने वांग खोर्‍याला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आलेले अपयश आगामी लोकसभा निवडणुकीत भरुन काढण्याची संधी आली आहे. विंग, कोळे, तारुख विभागातील माथाडी कामगारांना अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर नरेंद्र पाटील यांनी खूप मोठे सहकार्य केले आहे. वाडीवस्तीत राहणार्‍या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेउन येण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. अनेक वर्षानंतर पाटण तालुक्याला लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. तारुख, कुसूर विभागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची अनेक प्रलंबीत कामे मार्गी लागली आहेत. वाड्यावस्त्यांपर्यंत वॉटर एटीएम पोहोचवली आहेत. जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. सरकारकडून सर्व प्रकारच्या विकासकामांसाठी भरीव विकास निधी उपलब्ध करुन दिला जात असल्यामुळे सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची परिसरातील ग्रामस्थांची जबाबदारी आहे. यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचे हात बळकट केले पाहिजेत. शेखर चरेगावकर म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. संरक्षण, शेती, रोजगार, पाणी यासाठी केंद्र व राज्य सरकारने गेल्या 5 वर्षांत खूप मोठे काम केले आहे. काम पुढे सुरु ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. 1999 साली भाजप-शिवसेना सरकारला मतदारांनी दुसर्‍यांदा संधी न दिल्यामुळे केंद्रातील वाजपेयी सरकार तसेच राज्यातील मनोहर जोशी सरकारने सुरु केलेल्या योजना नंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने बंद केल्या. गेल्या 5 वर्षांत सुरु केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी 5 वर्षे लागणार आहेत. सुवर्णचतुष्कोन योजना अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरु केली होती. परंतु काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या नावाचे फलकही काढून टाकले. देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट गर्जत आहे. सातारा जिल्ह्यात भाजपला खासदार किंवा आमदार नसतानाही साडे अकरा हजार कोटींची विकासकामे केंद्र आणि राज्य सरकारने केली आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुल्या व्यासपीठावर येउन त्यांच्या सरकारच्या काळात झालेल्या आणि आमच्या सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची तुलना करावी. यावेळी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई व मित्रपक्षाचे प्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular