Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीशहरातील खड्डे बुजवायला कोणाची परवानगी लागते?

शहरातील खड्डे बुजवायला कोणाची परवानगी लागते?

उदयनराजेंकडून पालिका अधिकार्‍यांची झाडाझडती
सातारा : सातारा शहरातील रस्ते, खड्डे आणि स्वच्छतेच्या अनागोंदी कारभारावर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी कडक ताशेरे ओढले. खड्डे बुजवण्यासाठी तुम्हाला कोणाची परवानगी लागते? शहरातील कचर्‍याची व्यवस्था कोणी बघायची? उदयनराजेंनी केलेल्या प्रश्नाच्या भडीमारावर पालिका अधिकार्‍यांची बोलतीच बंद झाली. शहापूर पाणी पुरवठा योजनेचे अद्ययावतीकरण, नवीन घंटागाड्यांची झालेली खरेदी याची तपशीलवार माहिती उदयनराजे यांनी घेऊन शहरात तातडीने रस्त्यांचे पॅचिंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सातारा पालिकेच्या अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. खड्डे बुजविण्यासाठी तुम्हाला कोणाची परवानगी लागते का? असा प्रश्‍न करून घंडागाड्या कचरा उचलतात का? हे कोणी पहायचे. नागरीकांच्या तक्रारी येईपर्यंत गप्प बसू नका कामे करा. अशा खास कानपिचक्या उदयनराजे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिल्या.
सातारा शहरात सध्या ग्रेडसेपरेटरचे काम सुरू असल्याने प्रमुख रस्त्यांची अवस्था खूपच वाईट झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून पॅचिंगच्या कामांकडेही दूर्लक्ष झाले होते. यासर्व प्रकाराची माहिती उदयनराजे भोसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी आज जलमंदीर या निवासस्थानी पालिकेच्या सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत कामाचा आढावा व झाडाझडती अशी वेळ आल्याने विभाग प्रमुख व प्रशासनातल्या अधिकार्‍यांना आपली बाजू मांडताना सारवासारवी करावी लागली.
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी तुम्हाला मुहूर्त लागतो का? कोणाची परवानगी लागते, असा प्रश्‍न उदयनराजे यांनी मुख्याधिकार्‍यांना रोखून केल्याने बैठकीची सुरवातच झाडाझडतीने झाली. घंटागाड्या कचरा उचलत नाहीत, हे कोण पाहणार, असे विचारले. वॉर्ड एक ते 20 मधील रस्त्याच्या पॅचिंगच्या कामांसाठी 30 लाख रूपये मंजूर केले होते. त्यातील 20 लाख खर्च झाले असून दहा लाख शिल्लक असल्याने त्यातून पॅचिंगचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच पॅचिंगची कामे दर्जेदार करा भले त्याचे बजेट वाढले तरी त्याची काळजी करू नका अशा स्पष्ट सूचना उदयनराजे यांनी दिल्या. तसेच पालिकेने नव्याने खरेदी केलेल्या घंडागाड्या येत्या 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यासाठी स्वच्छतेचे काम खासगीकरणातून होणार आहे.
शहापूर पाणी योजनेचे दोन पंप बंद पडले होते. त्यामुळे नवीन दोन पंपांची खरेदी करण्यात आली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. अधिकार्‍यांनी काम करावे, जो काम करेल तो प्रिय असेल. जो काम करणार नाही, त्याचे काय करायचे ते मी बघतो, असा सज्जड दमही त्यांनी भरला. दोन तास झालेल्या या बैठकीत पालिकेच्या अधिकार्‍यांना अक्षरशा घाम फुटला. बैठकीतून बाहेर आल्यावर मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा चेहर्‍यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular