Wednesday, December 3, 2025
Homeठळक घडामोडीदरड कोसळून घर,पिठाची गिरणी व दुकान जमीनदोस्त

दरड कोसळून घर,पिठाची गिरणी व दुकान जमीनदोस्त

सातारा : हरिजण गिरीजण सह गृहनिर्माण संस्था केसरकर पेठ सातारा येथे दरड कोसळून घर,पिठाची गिरण व दुकान जमीन दोस्त झाले. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जीवीत हानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान झाले असल्याची माहिती इंताज अय्याज इनामदार (भाभी) यांनी दिली आहे.
शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास अचानक घडलेल्या दुर्देवी घटनेमुळे भाभी व त्यांचे कुंटूबीय हादरून गेले. या घटनेची माहिती मिळताच सातारा नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे , नगरसेविका अनिता घोरपडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. व तातडीने पालीकेच्या जेसीबीच्या सहाय्याने कोसळलेल्या दरडीमधून भाभींचे दुकान तसेच घरावरील दरड काढण्याचे काम युध्द पातळीवरती सुरू करण्यात आले. घडलेल्या दुर्देवी घटनेतुन भाभींना पालिकेच्यावतीने सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी दिले.
51 अ 1/2 केसरकर पेठेत गेले 15 ते 20 वर्षे इंताज भाभी आपल्या पती, मुलगा व मुली सोबत राहत आहेत. पिठाची गिरणी तसेच किराणा पध्दतीचे दुकान त्या चालवत आहेत. शनिवारी रात्री जेवण करत असताना अचानक दरड कोसळून त्या कुंटूबासहित आपल्या घरामध्ये अडकल्या. नंतर घराच्या मागील बाजूने बाहेर पडल्या. संपुर्ण रात्र घराबाहेर शेजार्‍यांच्या घरी काढावी लागल्याचे भाभी सांगतात. हरिजण गिरीजण सह गृहनिर्माण संस्थेच्या निर्मीतीपासुन मी या ठिकाणी राहत आहे. संस्थेची वॉचमन म्हणून देखील सुरूवातीला मी काम केले आहे. मी गिरणी व दुकान चालवण्यासाठी बचत गटांच्या महिलांकडे कर्ज काढले आहे. या व्यवसायावरतीच माझ्या कुंटूबाचा उदरनिर्वाह चालत आहे. काही दिवसांपूर्वीच मी पत्र्याचे शेड नव्याने टाकले होते. आता माझ्या कर्जाच्या हप्त्यांना फेडणे अवघड बनणार आहे. यासाठी मला सहकार्य मिळावे अशी आर्त हाक भाभींनी सातारा वासीयांना घातली आहे.
आयुष्याच्या खडतर प्रवासामध्ये अनेक हालअपेष्ठा सहन करत आजपर्यंत परिस्थितीवर मात करत जगत आलेल्या भाभांनी कोणत्याही परिस्थितीत कच खाल्ली नाही. चांगल्या पध्दतीत सुरू असलेली गिरणी, व दुकाना सोबतच सावरत आणलेलं कुंटूंब जमीन दोस्त झाल्याचे स्वत:च्या डोळ्यांनी पाहताना इंताज (भाभी) यांचे अश्रु अनावर झाले होते.
सातारा शहरामध्ये संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. किल्ले अजिंक्यतारा तसेच चारभिंत्ती परिसरात डोंगरा नजीकच्या रहिवाश्यांना अश्या दुर्देवी घटनेतुन जीवीत हानी तसेच आर्थिक नुकसानीचा सामना करण्याची वेळ येवु नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. त्रिशंकु भागातील रहिवाश्यांना पालीका तसेच ग्रामपंचायत यांच्याकडून सोयी सुविधा मिळण्यावाचून परवड होत असल्याच्या अनेक घटना पहायला मिळतात. सातारा नगरपरिषदेच्या व गोडोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भाभींना आर्थीक सहकार्य मिळणार का हा प्रश्न आता त्यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे. मतदानासाठी नगरपरिषदेचा नागरिक मात्र मदत देण्यासाठी त्रिशकुं अशी हद्द पाहताना नेमकी दुर्देवी घटना ओढावलेल्या भाभींना कोण व कशी मदत मिळवून देते याकडे सातारा वासीयांचे लक्ष लागून राहणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular