Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमांडवे येथे वस्तीवर दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास

मांडवे येथे वस्तीवर दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास

शस्त्राचा धाक दाखवत शारिरीक अत्याचाराबरोबर जीवे मारण्याची धमकी
वडूज : खटाव तालुक्यातील मांडवे परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चांगलाच धुमाकूळ घातला. या चोरट्यांनी तीन वस्त्यांवर एकूण चार तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 22 हजार रूपयांची रोख रक्कम लांबविली. तर एके ठिकाणी चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवित शारीरीक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी देत जबरी दरोडा टाकला. अन्य दोन ठिकाणी घरफोड्या केल्या. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीसांनी दरोडा व घरफोड्यांचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, मांडवे येथील आंबेमळा वस्तीवर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वीस ते पंचवीस वयोगटातील चार ते पाच अज्ञात चोरटे आले. येथील ज्ञानदेव गोविंद खाडे, इंदुबाई खाडे, मुलगी नंदा वनवे (रा. भिगवण), व चार लहान मुले उकाड्यामुळे बाहेरील बाजूस अंगणात झोपले होते. चोरट्यांनी नंदा वणवे यांच्या गळ्यातील अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र हिसकावून तेथून पळ ठोकला. त्यांनतर चोरट्यानी नजिकच्याच पाटील वस्तीवरील वसंत बापूसाहेब पाटील यांच्या घरात चोरी केली. त्याठिकाणाहून चोरट्यांनी दहा हजार रूपयांची रोख रक्कम व मोबाईल संच लांबविला. नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा मांडवे- वडूज रस्त्यावरील बर्गे वस्तीकडे वळविला. येथील माळरानात दादासाहेब बाळासाहेब बर्गे यांचे घर आहे. श्री. बर्गे हे इथेनॉल प्रकल्पावर रात्रपाळीवर कामासाठी गेले होते. त्यावेळी घरात वृध्द माता सरस्वती, पत्नी मंदा, मुले सिद्धीकेश (वय 17), सोहम (वय 14) होते. चोरट्यांनी घराची खिडकीची काच फोडली. चोरटे आल्याचे लक्षात आल्याने घरातील बर्गे कुटूंबिय जागे झाले. त्यावेळी चोरट्यांनी चोरट्यांनी दरवाजावर बाहेरून मोठे दगड, फरश्या मारून लाकडी दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. घरातील महिलांसह सिद्धीकेश व सोहम यांना चोरट्यांनी चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये सिद्धीकेश व सोहम यांच्या छाती, हात, मान याठिकाणी जखमा झाल्या आहेत. चोरट्यांनी वृद्धा सरस्वती यांनाही फरफटत घराबाहेर नेले. तर सौ. मंदा यांच्या गळ्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, अर्धा तोळ्याचे कानातील रिंगा, एक तोळे वजनाचे लहान गंठण असे एकूण साडे तीन तोळे सोन्याचे दागिने व बारा हजार रूपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली.
पोलीस पाटील दत्तात्रय उर्फ दाजी पाटील तसेच गावातील सुमारे वीस ते पंचवीस युवक काल रात्रगस्तीवर होते. त्यावेळी त्यांना आंबेमळा,पाटील वस्ती येथे चोरटे आल्याचे समजल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. मात्र चोरट्यांनी तेथून पळ काढून थेट माळरानातील बर्गे वस्ती गाठली. या दरम्यान दारावर मारलेल्या दगडांचा मोठा आवाज ऐकू येऊ लागल्याने या युवकांनी बर्गे वस्तीकडे धाव घेतली. त्यावेळी ग्रामस्थ येत असल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्‍वान पथक तैनात करण्यात आले होते.न पंचकृशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular