महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा : ना. चंद्रकांत पाटील

वाई ः सातार्‍याच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही निवडणूक आहे. लढाई सोपी नाही परंतू आम्ही कठोर संघर्षाची तयारी केली आहे. जगात भारताला नंबर वन बनविण्यासाठी, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपली वील पॉवर वाढवून रात्रीचा दिवस करून काम करावे व महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना भरघोस मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन महसुलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले.
येथील औद्योगिक वसाहतीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, रासप व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ वाई-खंडाळा- महाबळेश्‍वर विधानसभा मतदारससंघातील कार्यकर्त्यांचा जाहिर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ना. पाटील बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, किसनवीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, माजी खासदार गजानन बाबर, महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे, विजयाताई भोसले, नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, सौ. शारदा जाधव, अजित यादव, अनुप सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर म्हणाले, भाजपाच्या कामाचा धसका विरोधकांनी घेतल्यानेच सर्वजण एकत्र आले आहेत. शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. काँग्रेसच्या अध्यक्षांना एका मतदार संघातून निवडून येण्याची खात्री नसल्याने त्यांनी दोन मतदारसंघातून अर्ज दाखल केले, सांगलीच्या मत्रपत्रिकेतून काँग्रेसचे चिन्ह गायब झाले, त्यांना उमेदवार मिळत नाहीत, उत्तरप्रदेशमध्ये फक्त दोन जागांवर काँग्रेसने अर्ज दाखल केले आहेत आणि हे देश चालविण्याची स्वप्ने पाहतात. काँग्रेसचा स्वतःचे अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. जनतेला मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत. स्वतःला शेतीतील जाणकार समजणार्‍यांनी साखर उद्योग वाचविण्यासाठी इथेनॉल प्रकल्प का आणले नाहीत. साखरेस व शेतमालाला हमीभाव का दिला नाही याची उत्तरे द्यावीत. यांच्या काळात दहा वर्षे शेतमालाला हमीभाव देणारा स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट यांनी दाबून ठेवला. मोदी सरकारने शेतीला दिडपट हमीभाव दिला. चव्हाण म्हणतात की राफेलवर आम्ही 2001 मध्ये विचार केला होता मग चौदा वर्षे राफेल का खरेदी केले नाही. चौदा वर्षे हे कमिशन देण्यासाठी एजंट शोधत होते. यांना देशाच्या संरक्षणाशी काही देणे-घेणे नाही. मुलींच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मोदीसरकारने अनेक योजनांचे लाभ त्यांना दिले आहेत. बेटी बचाव-बेटी पढाव योजना, मुद्रा योजना, अटल पेंशन योजना, घरोघरी शौचालय, उज्वला गॅस योजना, अशा अनेक योजना मोदी सरकारने जनतेच्या कल्याणासाठी आणल्या. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. यांच्या काळात सगळया पुढार्‍यांची कर्जमाफी झाली खर्‍या शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळालाच नाही. सरकारकडे काँग्रेसच्या काळातील कर्जमाफीचे दस्ताऐवज नाहीत. कारण यांच्या पुढार्‍यांनी पाच एकर जमिनीवर पाचशे कोटी कर्ज घेतले होते. यांनी केलेले उद्योग बाहेर येवू नयेत म्हणून यांना सत्ता हवी आहे, असे सांगून ते म्हणाले, नमामी गंगेच्या धरतीवर आम्ही नमामी कृष्णे प्रकल्प हाती घेणार आहोत. कृष्णेत मिसळणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून कृष्णा नदीची स्वच्छता व पावित्र्य सुशोभीकरण करण्यात येईल. तसेच गडकोट किल्ल्यांचे संरक्षण व सुशोभीकरणासाठी भरघोस निधी उपलब्ध करण्यात येईल. शेती पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल. निम्म्याहून अधिक खासदार निधी खर्ची न केल्याने परत जातो हे आपल्या जिल्हयाचे दुर्दैव आहे. त्यामुळे देशाचा विचार करून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा.
माजी खासदार गजानन बाबर म्हणाले, मोबाईल व टिव्हीमुळे आज सर्वांना खरे काय व खोटे काय हे समजते आहे. साठ वर्षे काँग्रेसने सत्ता उपभोगली तरी अजून गरीबी हटाव चा नारा देतात. आज प्रत्येकाकडे दोन दोन मोबाईल आहेत कोण गरीब राहिला आहे? केवळ वैचारीक गरीबी आहे. पैशाने मते विकत घेता येत नाहीत. येणार्‍या भावी पिढीसाठी निर्णय घेण्याची ही वेळ आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा. मोदींची सत्ता पुन्हा येणार आहे. या परिवर्तनात सहभागी होण्याची ही संधी आहे. राष्ट्रवादीने माथाडींचा केवळ वापर करून घेतला त्यांचे प्रश्‍न मात्र सोडविले नाहीत.
किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, तुम्ही कोणाला निवडून देणार यापेक्षा देश कोणाच्या ताब्यात देणार हे महत्वाचे आहे. यासाठी ही निवडणूक आहे. देश सर्वोच्च स्थानावर आहे त्यामुळे देशाचे नेतृत्व सक्षम हातातच असले पाहिजे. सहकार व साखर उद्योग अडचणीत असताना साखरेला हमी भाव देवून इथेनॉल प्रकल्प निर्मितीला चालना देवून मोदी सरकारने कारखाने व शेतकरी वाचविण्याचे काम केले आहे. पुलवामा हल्ल्यात 42 जवान शहिद झाले. त्यावेळी संपूर्ण देश भयभीत होता. परंतू मोदी सरकारने एअरस्ट्राईक करून चोख उत्तर देत पाकच्या मुसक्या आवळल्या. व्यक्ती कोण यापेक्षा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा यासाठी ही निवडणुक आहे. आम्ही राजांवर टिका करणार नाही ते माझे मित्र आहेत. परंतू ही लोकसभेची निवडणुक आहे संसदेत माणूस पाठविण्यासाठीची ही निवडणूक आहे टोल नाक्यावर माणूस पाठवायची नाही. अशी खोचक टिका करीत भोसले म्हणाले, आम्हाला तुमचा अभिमान आहे परंतू लोकसभेचा उमेदवार हा नरेंद्र पाटीलच असेल. आता भिण्याचे दिवस संपले आहेत. आम्ही पाहुणे आहोत, भापजा-शिवसेनेने आमचा उपयोग करून घ्यावा. आमच्या चार पावले पुढे तुम्ही राहिले पाहिजे. आमचे परतीचे दोर केव्हाच कापले आहेत. आम्हाला भविष्याची चिंता नाही. महायुतीचेच काम करणार आहे. मदन भोसलेच स्वतः निवडणुक लढवित आहेत असे समजून कार्यकर्त्यांनी काम करावे व नरेंद्र पाटील यांना निवडुन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महायुतीचे उमदेवार नरेंद्र पाटील यांनी आपणास भरघोस मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन करून सर्वांना अभिवादन केले.
यावेळी यशवंत लेले, महेश शिंदे, हणमंतराव वाघ, मंगेश खंडागळे, दिलीप वाडकर, अजित वनारसे, संतोष कोळेकर, अविनाश फरांदे, सौ. शारदाताई जाधव, काशिनाथ शेलार, यशवंत घाडगे, अनुप सुर्यवंशी आदींनी मनोगते व्यक्त केली.
मेळाव्यास वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी. व्ही. काळे, सिनेटचे सदस्य अ‍ॅड. जगदिश पाटणे, नगरसेवक महेंद्र धनवे, सतीश वैराट, सौ. वासंती ढेकाणे, सौ. रुपाली वनारसे, सौ. सुनिता चक्के, विजय ढेकाणे, शंकरराव पवार, केशवराव पाडळे, यांच्यासह वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, आरपीआय, रासप व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
…आणि मदनदादा चिडले.
मदन भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ हा पहिलाच मोठा मेळावा आयोजित केला होता. वेळेच्या बाबतीत काटेकोर असलेले दादा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजनात सहभागी न होण्याची पध्दत पाहून व त्यांच्यातील निवांतपणा पाहून चीडले. याचा प्रत्यय त्यांच्या भाषणात जाणवला. ते म्हणाले, उमेदवार तुमचा आहे. मला गाडी आली तरच मी बाहेर पडेन, नंतर प्रचार करेन, हे चालणार नाही. मी व माझे कार्यकर्ते यांना हे वातावरण नवीन आहे त्यामुळे मी गेस्ट आहे होस्टचे काम येथे करावे लागतेय, हे बरोबर नाही, असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुनावले.