वाई :- वाई, पाचगणी, महाबळेश्वर ही ठिकाणे पर्यटन स्थळ असल्याने या परिसरात जमिनी व बंगले यांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई या ठिकाणच्या धनदांडग्यांचा वावर वाढल्याने एक प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात येवून जमिनी, व बंगले बळकावण्याच्या घटनाघडल्याच्या नोंदी वाई, पाचगणी पोलीस ठाण्यात आहेत. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण असणे हे पर्यटन वाढीसाठी घातक असून अशी कृत्य करणार्यांच्यावर मोक्का व तडीपार अंतर्गत कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक- विश्वास नांगरे-पाटील यांनी वाई, पाचगणी, महाबळेश्वर या पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी दरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक- डॉ. संदीप पाटील, एल सी.बी.चे पद्माकर घनवट, उपविभागीय पोलीस अधिकारी- राजाराम पाटील, जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव- प्रा. नारायणराव चौधरी, प्राचार्य- डॉ. चंद्रशेखर येवले, वाई पोलीस निरीक्षक- विनायक वेताळ, भुईंज पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक- बाळासाहेब भरणे, पाचगणीचे पोलीस निरीक्षक- नारायणराव पवार, महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- राजेंद्र राजमाने, मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- देविदास कठाळे, उप निरीक्षक- तृप्ती सोनावणे, शिरीष शिंदे, राजेंद्र कदम, दीपक ओव्हाळ, लेप्टनंटप्रा. समीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, या परिसरातील अनेक वीर जवानांनी देशासाठी बलिदान दिले असून त्या शहीद कुटुंबियांचे प्रलंबित प्रश्नात जातीने लक्ष घालून प्राधान्याने सोडविणार, पोलीस व नागरिक यांच्या समन्वय वृन्दिगत होण्यासाठी प्रबोधन करणार, महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची पुनर्रचना करणार, वाई- पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणच्या मुख्य रस्त्याचा आराखडा तयार करून अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करणार, महिलांनी स्वसंरक्षाणासाठी योग्य पध्दतीचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे, हे प्रशिक्षण देणार्या संस्थाना सहकार्य करणार, वाई, पाचगणी महाबळेश्वर पोलीस वसाहतींचे काम अग्रक्रमाने हाती घेणार, सातारा जिल्ह्यातील गावोगावचे पोलीस पाटील रिक्त असणारीपदे त्वरित भरण्यात येणार, पाचवड व भिलार येथे नागरिकांच्या मागणीवरून पोलीस चौक्या उभ्या करणार, पोलीस मित्र योजनेत जास्तीत-जास्त तरुणांचा सहभाग करून घेणार, तसेच तरुणांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी गावो-गावी समाजातून दबाव गट तयार करण्यासाठी प्रबोधन व्हावे असे नमूद करत त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. यावेळी नागरिकांमधून अनेकांनी आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जमीनी,बंगले बळकावणार्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करणार : नांगरे-पाटील * पोलीस ठाण्यांच्या वार्षिक तपासणी कार्यक्रमात केले प्रतिपादन * पाचवड व भिलार येथे नवीन पोलीस चौक्या उभ्या करणार
RELATED ARTICLES