पाटण दि. १७ :- ( शंकर मोहिते) – कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेल्या पावसामुळे सध्या धरणात प्रतिसेकंद तब्बल सरासरी ३९,२२५ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा १०२ टि.एम.सी. या प्रमाणात असून धरणाअंतर्गत पडणा-या पाऊसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पहाता आवश्यकतेनुसार कोयना नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवरून पाच फुटांवर आणून त्यातून ४३६१३ क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे कोयना नदीला पुरपरस्थिती निर्माण झाली आहे. तर पाटण येथील मुळगावला जोडणारा पूल गुरुवारी रात्री पासून पाण्याखाली गेला आहे. अनेक ठिकाणी नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर आज थोडा मंदावला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३९,२२५ इतकी झाली आहे. यामुळे शुक्रवार सायंकाळी ४ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवरून पाच फुटांवर स्थिर करण्यात आले आहेत. यामुळे धरणातून नदीपात्रात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ४३,६१२ इतका झाला आहे. सध्या सुदैवाने पूर्वेकडील विभागात पाऊस नसल्याने कोयनेसह पुढील नद्यांच्या पात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता आहे. कोयना नदीला निर्माण झालेल्या पुरपरस्थितीमुळे पाटण – मुळगाव, कवरवाडी, त्रिपुडी या गावांना जोडणारा पूल गुरवारी रात्री १० वा. सुमारास पाण्याखाली गेला आहे. पाणीसाठ्यात सध्या आहे त्यापेक्षा जास्त वाढ न करण्याचा प्रयत्न आहे. अजूनही पाऊस कायम व बाकी असल्याने शक्य तेवढ्या प्रमाणात पूर्वेकडे पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी व लोकवस्त्यांनी सावधानता बाळगावी असे अवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.
दरम्यान पूर्वेकडील विभागात सुदैवाने सध्या पाऊस नसल्याने त्या अंतर्गत छोट्या नद्या, ओढ्यांना पाणी नाही . जर येथेही मोठा पाऊस असता तर धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेले पाणी आणि पूर्वेकडील नद्या, ओढ्यांचे पाणी कोयना नदी सामावून घेत नसल्याने मग नदीकाठच्या अनेक गावात, लोकवस्त्या व बाजारपेठेत हे फुगीचे पाणी घुसून त्याठिकाणच्या शेती पिकांसह अन्य वित्तीय हानीही झाली असती मात्र अजूनतरी तशी गंभीर वेळ आली नाही.
धरणात आता एकूण १०१.७८ टि. एम. सि. पाणीसाठा, पाणीउंची २१०७.१० फूट, जलपातळी ६५८. ६२२ मिटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे एकूण ४४६३ मि. मि. , नवजा ४५३८ मि. मि. तर महाबळेश्वर येथे ४०६९ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे.