डॉ. श्रीराम भाकरे व हेमंत ओगले यांच्या फुलपाखरांच्या छायाचित्र प्रदर्शनास उत्स्फूर्तं प्रतिसाद ;  फुलपाखरांसाठी खास पुस्तक आणि प्रदर्शन हा सातार्‍यातील एकमेव उपक्रम


सातारा ः येथील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. श्रीराम भाकरे व आंबोली येथील हेमंत ओगले यांनी पश्‍चिम घाटातील पुलपाखरांच्या प्रजातींचा अभ्यास करुन माहीतीपूर्ण असे पुस्तक लिहीले आहे या पुस्तक प्रकाशनाचे औचित्य साधुन येथील कन्याशाळेत फुलपाखरांच्या फोटोंचे सुरेख प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सातारा येथील ड्रोंगो, रानवाटा आणि रोटरी क्लबऑफ सातारा यांचेवतीने हे प्रदर्शन आयोजीत केले आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी केवळ सातारकरच नव्हे तर अनेक परजिल्ह्यातूनही आज पहिल्या दिवशी निसर्गप्रेमी आणि फुलपाखरु प्रेमींनी गर्दी केली होती.हे प्रदर्शन रविवार दि. 20 ऑगस्ट सायंकाळी आठ पयंर्ंत सुरु रहाणार आहे.तसेच हे प्रदर्शन विनामूल्यपणे आपणास पहाता येणार आहे.
या दोन्ही संयोजकांनी लिहीलेल्या ..अ गाईड टू द बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्नं घाट.. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज सायंकाळी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष व प्रसिध्द निसर्गतज्ञ विलास बर्डेकर यांचे हस्ते संपन्न झाला.
फुलपाखरांचे जीवनचक या विषयावरील हे सखोल माहीतीपुर्ण पुस्तक आणि आयोजीत केलेले प्रदर्शन हे बहुधा संपुर्ण भारतातील पहिलेच पुस्तक आणि प्रदर्शन असावे असे मत अनेक जाणकारांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रदर्शनात आपल्या भागात आणि पश्‍चिम घाट परिसरात आढळणार्‍या हजारो फुलपाखरांच्या जीवनशैली आणि रंगसंगतींचे चित्रण  गेली 10 वर्षे मेहनत घेउन डॉ. भाकरे यांनी केले आहे. यातील सिलेक्टेड अश्या 125 फोटांना या प्रदर्शनात स्थान देण्यात आले आहे.
फुलपाखरांचा अभ्यास करताना डॉ. भाकरे यांनी संपुर्ण काश्मीर, प. बंगाल, ओरीसा तसेच सेव्हन सिस्टर्स या प्रदेशंातील फुलपाखरांचा अभ्यास करुन ही फोटोग्राफी केली आहे. फुलपाखरांच्या जीवनातील अंडी, अळी, कोष आणि या कोशाचे फुलपाखरात रुपांतर कसे होते हे दाखवणारा हा जीवनप्रवास या प्रदर्शनात आपणास पहायला मिळत आहे.या प्रदर्शनास आपण सर्व सातारकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन यावेळी संयोजकांनी केले आहे.
( छायाः अतुल देशपांडे)