जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी तयारीला लागण्याचे आदेश
सातारा : सातारा पालिकेत मनोमिलन तुटल्यानंतर उद्भवलेल्या राजकीय संघर्षात नगरविकास आघाडीला अवघ्या 12 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत नक्की काय चुकले याची कारणे शोधण्यासाठी नगरविकास आघाडीची आत्मचिंतन बैठक गुरुवारी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची येथील निवासस्थानी पार पडली. ही बैठक निश्चितच गोपनीय होती. मात्र जनाधार वाढवण्यासाठी लोकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करुन विकास कामांसाठी पाठपुरावा करण्याच्या स्पष्ट सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत. आणि संघटनात्मक बांधणी आणि बदल याचे स्पष्ट संकेतही दिले. या बैठकीला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले नगरविकास आघाडीचे सल्लागार अॅड. हेमंत कासार तसेच पराभूत उमेदवार व विजयी 12 उमेदवार सर्वच यावेळी उपस्थित होते. सर्व प्रथम आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी नूतन नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये प्रवीण पाटील व पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी आपापली मते मांडली. त्यांच्या मनोगतात आपण आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्यात कुठेतरी कमी पडलो. नजिकच्या काळात कार्यकर्ता जपला जावू प्रभागातील कामे होण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष घालणे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे हे गरजेचे असल्याचे कदम यांनी सांगितले. मतदारांच्या विश्वासास पात्र राहण्यासाठी जनसंपर्क वाढवत राहणे हीच खरी गरज आहे असे प्रवीण पाटील म्हणाले. यावेळी लीना गोरे, नगरसेवक अमोल मोहिते, शेखर मोरे, अशोक मोने यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने शहरात पुन्हा कामाला सुरवात करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपली संघटनात्मक बांधणी महत्वाची आहे. नविआची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुन्हा कामाला लागावे. आपले मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.