सातारा : सातारा शहरामध्ये दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक असून लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, अपघात घडू नये अथवा कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संदीप पाटील, पोलीस अधिक्षक, यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 नुसार दि. 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 12 ऑक्टोबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत अंतर्गत वाहतूक मार्गात व पार्कींग व्यवस्थेत खालील प्रमाणे तात्पुरता बदल केला आहे.
दैनंदिन वाहतुकीचे बंदी घालण्यात येणारे मार्ग : राजपथावर कामनी हौद-देवीचौक- मारवाडी चौक-मोती चौकापर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद. कमानी हौद ते शेटे चौक पर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद. कर्मवारी भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौक पर्यंत प्रवेश बंद. मोती चौक-एम.एस.ई.बी. ऑफिस-समर्थ टॉकीज-राधिका टॉकीज चौक पर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद. राधिका टॉकीज चौक ते बारटक्के चौक ते बसाप्पा पेठ चौक पर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद. स्टेट बँक प्रतापगंजपेठ सातारा (काटदारे मसाले दुकान) ते डी. सी. सी. बँक ते मोती तळे पर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद.
समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद. बोगदा ते शाहू चौक हा मार्ग जड वाहनांसाठी (एस.टी.बससह) व अवजड वाहनांसाठी बंद राहील (सज्जनगड व कास पठारकडे जाणारी व येणारी जड वाहने (एस.टी. बससह) व अवजड वाहने बोगदा, शेंद्रे मार्गे जातील व येतील ).
वाहतूक मार्गातील बदल : बोगदा, समर्थ मंदिराकडून चांदणी चौक मार्गे एस.टी. स्टॅन्ड साताराकडे येणारी सर्व हलकी वाहने (जड व अवजड वाहने वगळून) ही चांदणी चौक राजवाडा मार्गे न येता समर्थ मंदिर, अदालतवाडा, शाहूचौक मार्गे एस. टी. स्टॅन्ड साताराकडे जातील.
मोळाचा ओढाकडून बुधवार नाकाकडे येणारी सर्व वाहने ही मोळाचा ओढा, महानुभव मठ, करजे भूविकास बँक, एस. टी. स्टॅन्ड मार्गे पोवई नाक्याकडे येतील. शिवाजी सर्कलकडून मुख्यालय मार्गे जाणारी वाहने शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटार स्टॅन्ड मोती चौकाकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने त्या परिसरात राहणार्या रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने घेऊन जावे. शहरात खरेदी करीता येणारे दुचाकी वाहन धारक यांनी आपली वाहने सोयी नुसार गांधी मैदान राजवाडा, जिल्हा तालीम संघ मैदान येथे पार्क करावीत. बुधवार नाका ते शनिवार चौक हा मार्ग फक्त दुचाकींना ये-जा करण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे.
वरील सर्व मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने वगळून इतर सर्व वाहनांच्या मार्गात वरीलप्रमाणे बंद व बदल करण्यात येत आहे. पार्कींग व्यवस्था पुढील प्रमाणे राहील. मोती चौक, मारवाडी चौक, देवीचौक, कमानी हौद, शेटे चौक, शनिवार चौक,जुना मोटार स्टॅन्ड, सम्राट चौक व परत मोती चौक मार्गे काटदरे मसाले दुकान मार्गे मोती तळे किंवा एम. एस. ई. बी. ऑफिस, समर्थ टॉकीज, राधिका टॉकीज चौक ते प्रतापसिंह शेती शाळा कृत्रीम तलाव असा दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक मार्ग असून या कालावधीत या मिरवणूक मार्गावर शहरातील राहणार्या नागरिकांनी व या परिसराकडे जाणार्या नागरिकांनी तसेच विसर्जन मिरवणूक विना अडथळा सुरळीत पार पाडण्यासाठी शहरातील वाहतूक वरील प्रमाणे इतर मार्गाने वळविण्यात आलेली आहे.
दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक मार्गावर राहणार्या नागरिकांनी आपली वाहने ही तालिम संघाजवळील मैदान, गुरुवार परज व गांधी मैदान या तीन ठिकाणी अथवा पर्यायी जागेत पार्किंग करावीत. वरील सर्व बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.