वाई येथे भव्य मिरवणूक तर, पाचगणी, महाबळेश्वर येथे जलकुंभाचे जंगी स्वागत
वाई : शनिवारी 24 डिसेंबर रोजी अरबी समुद्रात छ. शिवाजी महाराजांचा अश्वारुड पुतळ्याचे भूमिपूजन समारंभ देशाचे पंतप्रधान ना नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री- ना. देवेंद्र फडणवीस छ.शिवाजी महाराजांचे सातारा व कोल्हापूर वंशज छ. खा.उदयनराजे भोसले, छ. खा. संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून या भूमीपूजनासाठी महाराष्ट्रातील छ. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोट किल्ल्यावरील पवित्र माती पवित्र जल नेण्यात येणार असून त्याच पार्श्वभूमीवर वाई तालुका भारतीय जनता पक्षाने गुरुवार 22 डिसेंबर रोजी प्रताप गडावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील पवित्र माती व श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील पाच नद्यांच्या उगमावरील जल जलकुंभातून आणण्यात आले असून ते मुंबई येथे होणार्या भूमिपूजन समारंभासाठी रवाना करण्यात आले आहे. प्रताप गडावर हर-हर महादेव व जय शिवरायच्या घोषांनी अवघे वातावरण शिवमय झाले होते. यावेळी पंचकृशीतील शिवभक्तानी फुलांची पुष्प वृष्टी केली.
दरम्यान प्रताप गडावरील आणण्यात आलेली पवित्र माती व जलकुंभ हा प्रताप गडावरील भवानी मातेच्या चरणी स्पर्श करून विधिवत पूजन करून महाबळेश्वर येथे आणण्यात आले असता महाबळेश्वर व पाचगणी ग्रामस्थांनी पवित्र माती व जलकुंभाचे पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केले. तर वाई मध्ये सायंकाळी सहा वाजता तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व शिवप्रेमी यांनी वाई शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीचाशुभारंभ किसनवीर चौकातून करण्यात येवून वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य-अविनाश फरांदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष- काशिनाथ शेलार, प्रताप गड उत्सव समितीच्या निमंत्रक- श्रीमती विजयाताई भोसले,सतीश शेंडे, तालुकाध्यक्ष-सचिन घाटगे, उपाध्यक्ष- राजाभाऊ खरात, सरचिटणीस- रामचंद्र सणस, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष- मयूर नळ, तालुकाध्यक्ष- विक्रम वाघ, शहराध्यक्ष- अजित वनारसे, नगरसेवक- सतीश वैराट, वासंती ढेकाणे, अजित खामकर, विजय ढेकाणे, सुरेश जोशी, संजय गायकवाड, संदीप जायगुडे, हिंदुराव गोळे, राकेश फुले, व वाईकर नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तसेच प्रताप गडावरून आणलेली पवित्र माती व जलकुंभ 23 डिसेंबर रोजी पाहते पाच वाजता मुंबई शिवाजी पार्ककडे रवाना करण्यात येणार आहे. शिवाजी पार्क येथे महाराष्ट्रातून किल्ल्यावरून आणलेली पवित्र माती व जल यांची भव्य मिरवणूक काढण्यात येवून स्मारक स्थळावर नेण्यात येणार आहे.