* आरक्षण सोडतीने विद्यमान अध्यक्षांचा पत्ता कट * चार तालुक्यांत दिसणार महिलाराज * 13 गट खुल्या प्रवर्गासाठी *
सातारा : सातारा जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण सोडतीत अनेकांना फटका बसला तर फलटण, माण, वाई, सातारा या चार तालुक्यांत महिलाराज येणार आहे. महिलांसाठी राखीव असलेले 31 पैकी 17 गट या चार तालुक्यात राखीव झाले आहेत. फलटण, खंडाळा आणि जावळी या तीनही तालुक्यातील सर्वच्या सर्व 13 गट खुल्या प्रवर्गासाठी आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील दोन्ही गट राखीव झाल्यामुळे येथून अनेकांची निराशा झाली. दरम्यान, पुन्हा जिल्हा परिषदेत जाण्याचे डोळे लावून बसलेल्या अनेकांचा पत्ता कट झाला. जिल्हा परिषदेत मातब्बर म्हणून मिरवणाजया अनेकांना बुधवारी पडलेल्या आरक्षणामुळे दणका बसला असून त्यांचे मतदारसंघ राखीव झाले असून काही ठिकाणी तर महिला आरक्षण पडल्यामुळे गोची झाली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या 64 गटांसाठी बुधवारी आरक्षण सोडत झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या आरक्षण सोडतीसाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार विवेक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी येथे गर्दी केली होती.
सातारा जिल्हा परिषदेच्या यापूर्वी 67 जागा होत्या मात्र, प्रत्येक तालुक्याचे मुख्यालय नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तीन जागा कमी झाल्या आणि हा आकडा 64 वर आला. त्यामुळे पुर्वीच्या काही गटांची नावेही बदलली. सातारा तालुक्यात मात्र, एक गट नवीन झाला आहे. खटाव तालुक्यात 1, कोरेगाव 2 तर पाटण तालुक्यात 1 असे चार गट कमी झाले आणि सातारा तालुक्यात एक गट नव्याने वाढला आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या आरक्षण सोडतीत जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, उपाध्यक्ष रवी साळुंखे, अनिल देसाई, शिवाजी शिंदे, संजय देसाई, बाळासाहेब भिलारे, अविनाश फाळके, शशिकांत पिसाळ, राधाताई शिंदे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, किरण साबळे-पाटील, वैशाली फडतरे यांना फटका बसला आहे. त्यांचे मतदारसंघच राखीव झाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुपारी दोन वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी उपस्थितांचे स्वागत करतच आरक्षण प्रक्रियेची माहिती दिली. काही कायदेशीर बाबींवर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी विवेचन केले. वाघमारे यांनी 64 जागांपैकी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत, याची माहिती दिली. एकूण 64 जांगापैकी 39 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याचे नमूद करत यापैकी 18 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र)साठी 17 जागा राखीव ठेवण्यात आल्या. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 7 जागा निश्चित करण्यात आल्या. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी एकच जागा असून ती महिलेसाठी राखीव ठेवण्याचा आदेश राज्य शासनाचा असल्यामुळे यासाठी लोकसंख्येच्या आधारावर वाई तालुक्यातील नव्या नावाने अस्तित्वात आलेला यशवंतनगरफ गट निश्चित करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी सांगितले. अनुसूचित जातीफची लोकसंख्या जास्त असल्यामुळे गोडोली, सैदापूर, उंब्रज, वनवासवाडी, औंध, नागठाणे, गोकुळ तर्फ हेळवाक हे सात गट या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये नंतर पुन्हा उंब्रज, वनवासवाडी आणि नागठाणे हे तीन गट अनु. जाती महिलांसाठी चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आले. यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील गट निश्चित केले आणि त्यामध्ये पुन्हा महिलांसाठी कोणते गट राखीव आहेत हे चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आले.
यांना मिळाला ब्रेक
* सातारा – रवी साळुंखे, सतीश चव्हाण, राजू भोसले, किरण साबळे – पाटील,
* कराड – संपतराव जाधव,
* पाटण – संजय देसाई, सदाशिव जाधव, जालिंदर पाटील, राजाभाऊ शेलार
* कोरेगांव – अविनाश फाळके,
* वाई – शशिकांत पिसाळ
* महाबळेश्वर – बाळासाहेब भिलारे
* माण – सुभाष नरळे, अनिल देसाई, शिवाजी शिंदे, * खटाव – वैशाली फडतरे