दोन महिलांचे अपहरण करून मारण्याचा कट फसला
* पाचगणी पोलिसांकडून 17 जणांना अटक * पेट्रोलिंगदरम्यान संशयावरून कारवाई*
भिलार : भिलार येथे बंगला ताब्यात घेण्याचे कारणातून सुमारे 17 जणांचे टोळके दोन महिलांचे अपहरण करून जिवंत मारण्यासाठी चारचाकीमधून रात्री साडेबारा वाजणेच्या सुमारास घेऊन जात होते. भिलार येथील कृष्णाबाई चौकात पेट्रोलिंग करताना पाचगणी पोलिसांनी संशय आल्याने या दोन महिलांची सुखरूपपणे सुटका केली. सदर 17 जणांवर गुन्हा दाखल करून पाचगणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, भिलार येथील मेहत बंगल्यात स्टेला नरेंद्र मेहता (वय 45) आणि तिची बहीण जसिंथा मेनुद्दीन डिक्रुज (वय 55) रा. दहिसर मुंबई या दोघी रहात होत्या.26 सप्टेबर रोजी अर्चना राजेंद्र बारकुल (वय36) अरूंधती अनिल माने (वय37) आणि तारा गोपीनाथ राठोड (वय 42) या तीन महिला आम्ही सातार्यातील क्रांती मोर्चासाठी आलो असून आम्हाला बंगला भाड्याने पाहिजे असे सांगून या बंगल्यात आणखी काही लोकांसह प्रवेश केला. काही दिवस राहिल्यानंतर त्या सर्वजण एकत्र सातार्यालाही गेले. कालही सर्वजण महाबळेश्वरला फिरायला गेले. या चमुने आम्हाला जेवण बनवून द्याल का? असे स्टेला यांना विचारले त्यांनी देण्याचे कबुल केले. जेवण तयार केल्यानंतर काही वेळाने बंगल्याच्या आवारात काही अनोळखी पुरूष स्टेलाला जाणवले होते. अचानकपणे आलेल्या या पुरूष व महिलांनी दोघी बहिणींना तोंड दाबुन चिकटपट्टीच्या सहाय्याने बांधुन टाटा सफारी स्टोर्म (नं. एम एच 14 ई एच 5459) या गाडीत कोंबले व रेप करून गोळी घालु व पाण्यात फेकुन देऊन अशी धमकी दिली.
काल रात्री साडेबाराच्या सुमारास पाचगणी पोलिसांची गाडी पेट्रोलिंगसाठी भिलारला गेल्यावर भिलारमधील चौकात अचानक एक गाडी पुढे आल्याने दोन्ही गाड्या थांबल्या पोलिसांना समोरील गाडीत संशयास्पद हालचाली जाणवल्याने पोलिसांनी समोरील गाडी थांबुन पाहिले तर दोन महिलांना तोंड दाबुन हात पाय धरून चिकटपट्टीने बांधुन गाडीत झोपवल्याचे निदर्शनास आले. त्या महिला जीवाच्या आकांताने हात पाय हालवत मदतीसाठी प्रयत्न करीत होत्या. हे पोलिसांनी पाहिले. या महिलांना घातपात करून संपवण्याचा डाव या टोळक्याचा होता. लागलिच सहाय्यक फौजदार लक्ष्मण येवले, मुबारक सय्यद आणि ए. एस.जगताप या तिघांनी शिताफीने या गाडीतील सर्वांना ताब्यात घेतले व या दोन महिलांची सुटका केली. हे रात्रीच्या वेळी घडत असतानाच मागून येणार्या टेम्पो क्रं. एम एच 12 टी एल 2640 या गाडीतुन या चमुतील बाकीचे लोक याच बंगल्यातील प्रापंचिक साहित्य कपडे, दोन मोबाईल असे मिळुन 25000 रूपयांचे साहित्य घेऊन जात होते. त्यामुळे या तिघा पोलिसांनी याही टेम्पो व त्यातील लोकांना ताब्यात घेतले. बंगल्याचा बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेची फिर्याद स्टेला नरेंद्र मेहता (वय45) रा.भिलार यांनी पाचगणी पोलिसात दिली आहे. यावरून आणखी उरलेले आरोपी पोलिसांनी सकाळी भिलारमधून ताब्यात घेतले. या फिर्यादीवरून पाचगणी पोलिसात पुणे येथील रहिवासी असलेले अर्चनला राजेंद्र बारकुल, अरूंधती अनिल माने, तारा गोपीनाथ राठोड, नंदा साहेबराव जगताप, पुष्पा नवनाथ कवडे, सॅम डॅन्युल अँथेानी, शाम तुकाराम मोरे, दत्ता बबन जाधव, रूपेश राहूल जगताप, इरफान अब्दुल शेख,बिपीन मोझेस पिल्ले, जावेद बशीर शेख, राहुल नामदेव हजारे, फि:लीप थॉमस, आकाश नंदलाल पारखे, विशाल राजु ओव्हाळ, अमोल तुकाराम धावने यांना ताब्यात घेतले असून त्यांचेवर अपहरण करून जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना अटक करून त्यांचेवर कलम 395,362,447,342,368,509,506 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा अधिक तपास पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार यंाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.