खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडून सहापदरी रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा

कराड : पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सहापदीरकणाच्या कामासह महामार्गाच्या अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडून केंद्रीय स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खा.पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पेनतून आकारास आलेल्या देशातील सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पांतर्गत महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम 2005 मध्ये पूर्ण झाले. मात्र पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्हयातून जाणार्‍या महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक, प्रवासीमार्ग व जिल्हावासीयांमध्ये मोठी नाराजी आहे. एकीकडे कोणत्याही सोयी सूविधा न पुरवता टोलवसुली केली जात असल्याने जनतेत असंतोष आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करुन केल्या जाणार्‍या सहापदरीकरण कामाच्या दिरंगाईचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे.
महामार्गाच्या चौपदरीकणाचे काम 2005 मध्ये पूर्ण झाले आहे. परंतु आजतागयत हे काम प्रत्यक्षात व्यवस्थितरित्या पूर्ण झाले नसल्याने महामार्गाची दुर्दशा पहावयास मिळत आहे. महामार्ग कामाच्या दर्जाबाबत गेल्या 14 वर्षापासून प्रश्‍नचिन्ह आहे. तरीही टोलवसूली मात्र सुरुच आहे. दरम्यानच्या काळात आंदोलने, मोर्चांचे फार्स करण्यात आले परंतु यातून फारसे काही निष्पन्न झालेले नाही किंवा लोकप्रतिनिधींना याविषयी अपेक्षित यश आलेले नाही. खा.पाटील यांच्या पत्राची दखल घेत ना.नितीन गडकरी यांनी सहापदरीकरणाच्या कामासह महामार्गाच्या प्रलंबित कामासंदर्भात तपासणी आणि कृती करण्यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाच्या चेअरमन यांना आदेश दिले असल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे या कामांना आता गती मिळण्याचे संकेत मिळत आहेत.