अल्पेश लोटेकर
परळी
आपल्या राजाचा जन्मोत्सव व जसा जवळ येऊ लागला आहे तसतशी प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचू लागली आहे. परंतु यावर्षी कोरोनामुळे शासनाने अनेक अटी व नियम लावले असले तरी काय नवीन करता येईल तसेच यावर्षी शिवजन्मोत्सव कसा साजरा करायचा? कोणत्या किल्ल्यावरून शिवज्योत आणायची याची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठेत ही अवघा भगवा अवतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. डौलदार भगवे फेटे, मोठ मोठाले भगवे झेंडे यांनी दुकाने सजू लागली आहेत.
यावर्षी कोरोनाचे सावट असले तरीही शिवजन्मोत्सव मोठय़ा थाटात साजरा करण्याचा चंग बाळगोपाळांचा पासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत करू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांच्या गुलामीतून अवघा महाराष्ट्र वाचवला स्वराज्याची स्थापना केली. गडकिल्ले उभारुन परकीयांना आपल्या धगधगत्या तलवारीच्या धारेने शिरच्छेद करून यमसदनी धाडले. छत्रपती शिवाजी महाराज असा नुसता नामघोष केला तरीही रक्त सळसळते अशा छत्रपतींचा जन्मोत्सव अगदी वाडय़ा-वस्त्या पासून ते शहरातही मोठय़ा दिमाखात साजरा होतो.
गेल्या काही वर्षांपासून तरुणाईत छत्रपतींचे आचार-विचार हे रुजू लागले आहे. अनेक तरुणांनी आपल्या राजाचा इतिहास पुढच्या पिढीला देखील अनुभवता आला पाहीजे यासाठी रात्रंदिवस झटताना दिसत आहे. गडकिल्ल्यांनी स्वच्छता तसेच दुर्लक्षीत अशा गडकिल्ल्यांच्या सफरी यांमधून संवर्धनाचे काम ही तरुणाई पहायला मिळत आहे. त्याचा राजा जन्मोत्सव आहे म्हटल्यावर तरुणाईत तोच जल्लोष पहायला मिळत आहे. नुकतेच छत्रपती संभाजी महाराजांनी कोल्हापूर येथे गड किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्र भर जे दुर्ग संवर्धक काम करतात अशा सर्वांना एकत्रित करून महाराष्ट्रातील सर्व दुर्ग संवर्धन करण्यासाठी मोहीम हाती घेतल्याने यावर्षी दुर्गसंवर्धकांमध्ये नवचेतना उभारली आहे
चौकट
सोशल मीडियावर भगवे वादळ
तरुणाई आणि सोशल मीडिया हे जणू समीकरणच झाले आहे अलीकडील तरुण पिढी जो ट्रेन निर्माण करतोय तो ट्रेन जनमानसावर पगडा करतोय. सध्या वेलंटाईन डे चा आठवडा असला तरी सोशल मिडीयावर माहाराजांच्यां गाण्यांचा ट्रेंड पहायला मिळाला. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव भगवा ध्वज, गड-किल्ले, पोवाडे यांचा चांगलाच ट्रेन निर्माण झाला आहे शिवजन्मोत्सव आमच्या राजाचा शिवजयंती घराघरात अन् मनामनात अशा आशयाचे स्टेटस पोस्ट अपलोड होत आहेत