Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीपंधरा लाखांचे सोने घेवून दोन परप्रांतीय कारागिर फरार

पंधरा लाखांचे सोने घेवून दोन परप्रांतीय कारागिर फरार

घोडके सराफ यांच्या दुकानातील प्रकाराने सातार्‍यात खळबळ
सातारा : शनिवार पेठेतील सराफ दुकानात बहाणा करून दोन परप्रांतीय कारागीर पंधरा लाख रुपयांचे सोने घेऊन बेपत्ता झाल्याने सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा शाहुपुरी पोलीस ठाण्यात निसार सादिक व प्रभुदेवा (मीरपूर उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश रमेश घोडके (वय 45, अमृता ड्युप्लेक्स कोटेश्वर मंदिरा शेजारी, सातारा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. घोडके यांचे शनिवार पेठेत गेल्या चाळीस वर्षापासून सोने चांदी खरेदी विक्रीचे दुकान आहे. निसार व प्रभुदेवा हे दोन कारागीर त्यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून कामाला आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घोडके यांनी या दोघांना अर्धा किलो सोन्याचे दागिने बनविण्यास सांगितले. मजुरीच्या खोलीत त्यांचे काम सुरू होते. काही वेळानंतर गॅस सिलेंडर संपला आहे तो घेवून येतो असे सांगून आधी निसार सादिक त्यानंतर थोडयाच वेळात पोटात दुखतयं असे म्हणत प्रभुदेवा पण बाहेर निघून गेला. दुपारी अडीचच्या दरम्यान घोडके यांनी आतील रूममध्ये डोकावले असता तेथे कोणीच नव्हते. पंधरा लाख रुपये किंमतीचे अर्धा किलो सोने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बरीच शोधाशोध करूनही कोणीच आढळून आले नाही.
सातार्‍यात दिवसाढवळ्या सराफी दुकानातून सोने गायब झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. घोडके यांनी रात्री आठच्या नंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार तडवी अधिक तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular