सातारा : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांचे जीवन सुखकर व्हावे, कुटूंब समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर जावू नये यासाठी सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी म्हणून ध्वजदिन निधी संकलनास सढळ हाताने मदत करुन दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही अधिक ध्वज दिन निधी संकलन करावे , असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आज केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन-2019 चा शुभारंभ प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृह येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधीर महामुनी, पोलीस उपनिरीक्षक मालोजीराव देशमुख आदी उपस्थित होते.
7 डिसेंबर हा दिवस सर्व देशभर ध्वजदिन साजरा केला जातो. हा राष्ट्रीय महत्वाचा दिवस देशातील सर्व कार्यरत आणि माजी सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसापासून माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीचा शुभारंभ करण्यात येतो. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांनी तसेच नागरिकांनीही या ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करावी. तसेच माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष शिबीराचे आयोजन करुन या शिबीराच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वीर माता, वीर पत्नी, माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी, माजी सैनिकांचे पाल्य, तसेच जिल्ह्यात 4 ठिकाणी वसतिगृह आहेत.
या वसतीगृहासाठी ध्वजदिन निधीचा वापर केला जातो. या वर्षी जिल्ह्याला 1 कोटी 42 लाखांचे ध्वजनिधीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी माजी सैनिकांच्या पाल्यांचा विशेष गुणवत्ता प्राप्त पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी म्हणून ध्वजदिन निधी संकलनास सढळ हाताने मदत करा’
RELATED ARTICLES