पालिकेच्या नादुस्त टँकरमुळे शहरात ‘पाणीबाणी’

सातारा : ऐन मे चा रणरणता उन्हाळा आणि कास तलावाचा आटलेला विसर्ग यामुळे सातारा शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. असे असताना पालिकेच्या टँकरचा नोझल फिल्टर खराब झाल्याने पालिकेला सातारकरांची तहान भागवण्यासाठी खासगी टँकरची मदत घेण्याची वेळ आली आहे. फिल्टरच्या दुरुस्तीला कोल्हापूर गाठण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. सातार्‍यात निर्माण झालेली पाणीबाणी आणि मॉन्सूनच्या लांबलेल्या आगमनाची मिळालेली वर्दी यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची प्रचंड कसरत सुरू आहे.
दहा द .ल.घ.मी पाण्याचा रोज उपसा व उन्हामुळे एक इंच होणारे पाण्याचे बाष्पीभवनं यामुळे आधीच तहानलेल्या सातारकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असे असताना दुष्काळात तेरावा महिना म्हणावा की काय पाच हजार लीटर क्षमता असणारी पालिकेची फायर ब्रिगेडची गाडी नादुरुस्त झाली आहे.
टँकरच्या पाईपचा प्रेशर नोझल फिल्टरच बिघडल्याने पाणी पुरवठा विभाग प्रचंड अडचणीत आला आहे. सध्या सातार्‍याच्या पश्चिम भागात अपुरा पाणीपुरवठा व घंटेवारीचे कोलमडलेले नियोजन यामुळे टँकरच्या पंचवीस ते तीस फेर्‍या होत आहे. मात्र चालकांच्या दोनच शिफ्ट असल्याने
कामाचा खोळंबा होत आहे . फायर ब्रिगेडच्या जुन्या गाडीला तब्बल चौदा वर्ष झाली असून ती गाडी पाणीपुरवठयासाठीच वापरली जात आहे. मात्र नोझल चा गंज आणि सर्विसिंगचा अभाव यामुळे ऐन उन्हाळ्यात सातार्‍यात पाणी टँकर उभा करण्याची व खाजगी टँकर मागवून सातारकरांची तहान भागवण्याची वेळ आली आहे. नोझल दुरूस्तीसाठी कोल्हापूर ला पाठवण्यात आला आहे. खाजगी टॅकर प्रतिफेरी तीनशे ते पाचशे रुपये दर आकारला जातो त्यामुळे खाजगी टँकरवाल्यांची मात्र चांदी झाली आहे .दीड हजार लीटरचे चार ट्रॅक्टर सध्या सातार्‍यात गोलाकार चकरा मारत आहेत .