Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीकाशिनाथाचं चांगभल’च्या गजरात बावधनचे बगाड उत्साहात संपन्न

काशिनाथाचं चांगभल’च्या गजरात बावधनचे बगाड उत्साहात संपन्न

संपूर्ण राज्यातून लाखो भाविकांची बगाड उत्सवास उपस्थिती
वाई : संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा शुक्रवारी काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वडर याठिकाणी सकाळी आठच्या सुमारास पोहचले. त्यानंतर बगाड्या परमेश्वर उर्फ दिलीप रामचंद्र माने यांना कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. बगाड्याला वाजत गाजत बगाडाजवळ नेण्यात येवून त्याला पारंपरिक पध्दतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधण्यात आले होते.
बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी साडेआकराच्या सुमारास सुरूवात होते परंतु बगाडाचे मुख्य शिल्ड्च नादुरुस्त झाल्याने एकच्या दरम्यान बगाड सुरु झाले. त्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. बगाड वाई-पाचवड रस्त्यावर बावधन फाटयावर पाचच्या सुमारास पोहचले. तेथे रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, मिठाई, खेळणी, थंडपेयांची व फळांची दुकाने, रसाची गुर्हाचळे, देवांच्या फ्रेमची, कटलरीची दुकाने थाटण्यात आली होती. वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला व दर्शन घेतले.
बगाड गाड्यास शेतातून जाताना एका वेळी 12 बैल जुंपले जात होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर 4 बैल जुंपून बगाड ओढण्यात आले. ग्रामस्थांनी बगाडासाठी बैल धष्टपुष्ट केले होते, यासाठी शेतकर्यां नी संपूर्ण वर्षभर आपल्या बैलांची निगा राखून त्यांना खुराक देवून तयार केले होते. हे खिलारी बैल पाहण्यासाठी शेतकरी लोक लांबून येत असतात.गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेर्या काढण्यात आल्या. बगाड परिसरात मुंबईच्या व स्थानिक विविध संस्था, मंडळांनी भाविकांच्या सोईसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक व 108 अ‍ॅम्ब्युलंस तैनात करण्यात आली होती. वाई विभागचे महावितरणचे अविनाश खुसपे आपल्या टीम समवेत जातीने लक्ष ठेवून हजर होते. वाई नगरपरिषदेचे अग्निशमक बंब बावधन हायस्कूल येथे सज्ज ठेवण्यात आले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बगाड गावात पोहचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला.
बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाडयाच्या पुढे व पाठीमागे ट्रॅक्टरवर लाउडस्पीकरची सोय करून कृषी भुषण शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, राजू कदम, पोलीस पाटील अशोक भोसले, मदन भोसले, विलास पिसाळ, प्रतापराजे भोसले आदी मान्यवर ध्वनिक्षेपकावरून बगाडाबाबत सुचना देत होते. अनेक भाविकांनी दिलेल्या देगण्यांचा पुकारा यावेळी करण्यात येत होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भाविकांनाही सुचना देण्यात येत होत्या. पोलीस उप अधिक्षक अजित टिके, वाईचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे, उपनिरीक्षक-महेंद्रसिंह निंबाळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपनिरीक्षक, तीन पीएसआय व 60 पोलीस कर्मचारी, एक जलद कृतीदलाची तुकडी तैनात करण्यात येवून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. बावधन बगाडाच्या उत्सवात कोणताही उनुचीत प्रकार घडला नाही.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular